राजस्थानातील ‘या’ जिल्ह्यात अखेर पेट्रोलने गाठली शंभरी, पेट्रोलचा दर प्रतिलीटर १०० रुपये १३ पैशांवर


जयपूर – एकीकडे देशातील सर्वसामान्य नागरिक लॉकडाउनमधून बाहेर पडत आहेत, तर विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा एकदा रुळावर आणण्याचा प्रयत्न करत असतानाच नवी चिंता त्यांना सतावू लागली आहे. खासगी वाहनांचा वापर लॉकडाउनच्या काळात वाढत असतानाच सर्वसामान्यांची डोकेदुखी इंधनाचे वाढते दर वाढवत आहेत. त्यातच देशात सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली असून इंधनाचे दर लवकरच शंभरी गाठतील अशी शक्यता आहे. त्यातच हा उच्चांक राजस्थानमधील एका जिल्ह्याने गाठला आहे.

पेट्रोलच्या दराने राजस्थानमधील गंगानगर जिल्ह्यात शंभरी गाठली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या डेटानुसार, नॉन प्रीमिअम पेट्रोलची रिटेल किंमत प्रतिलीटर १०० रुपये १३ पैसे एवढी झाली आहे. देशभरातील पेट्रोल दरांमधील हा उच्चाकं आहे. दुसरीकडे गंगानगरमध्ये डिझेलचा दर ९२ रुपये १३ पैसे एवढा झाला आहे.

तर आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर २५ पेसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर २६ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर पेट्रोलचा दर प्रतिलीटर ९६ रुपयांवर पोहोचला आहे. हा दर सोमवारी ९५ रुपये ४६ पैसे, तर ९५ रुपये ७५ पैसे एवढा मंगळवारी होता. तर ९० च्या जवळ डिझेलचा दर पोहोचला आहे. डिझेलचा दर सध्या प्रतिलीटर ८६ रुपये ९८ पैशांवर पोहोचला आहे. हा दर सोमवारी ८६ रुपये ३४ पैसे एवढा होता.

पेट्रोल आणि डिझेलची किंमत दिल्लीमध्ये २५ पैशांनी वाढल्यामुळे सध्या पेट्रोलसाठी प्रतिलीटर ८९ रुपये ५४ पैसे आणि डिझेलसाठी ७९ रुपये ९५ पैसे मोजावे लागत आहेत. फक्त १० दिवसांमध्ये इंधनाचे दर तीन रुपयांनी वाढले आहेत. २०२१ मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आतापर्यंत २० वेळ वाढवण्यात आल्या आहेत. पेट्रोलच्या दरात एकूण ५ रुपये ५८ पैसे तर डिझेलच्या किंमतीत ५ रुपये ८३ पैसे एवढी वाढ झाली आहे.