दिल्ली पोलिसांनी पर्यावरणवादी कार्यकर्ता दिशाला ग्रेटा ‘टूलकिट’ प्रकरणी घेतले ताब्यात


नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांनी पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गने ट्विट केलेल्या टूलकिट प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. एका २१ वर्षाय पर्यावरण कार्यकर्ता आणि विद्यार्थी असलेल्या दिशा रवि या तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी तिला तिच्या बंगळुरूतील घरातून ताब्यात घेतले असून, तिच्यावर शेतकरी आंदोलनासंदर्भात असलेल्या टूलकिटमध्ये बदल केल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी ४ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला होता.

दिल्लीच्या वेशीवर मागील अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलक शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढली होती. दिल्लीत या रॅलीनंतर हिंसाचार झाला. त्यानंतर शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्याबरोबरच इंटरनेट सेवाही सरकारने बंद केली होती. याप्रकरणी पॉपस्टार सिंगर रिहानासोबतच पर्यावरण कार्यकर्ता असलेल्या ग्रेटा थनबर्गने ट्विट करत शेतकऱ्यांना पाठिंबा दिला होता. त्याचबरोबर ग्रेटाने एक टूलकिट ट्विट केली होती. जीनंतर डिलीट करण्यात आली.

दिल्ली पोलिसांनी टूलकिटसमोर आल्यानंतर ४ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंदवला होता. पोलिसांनी याच प्रकरणात दिशा रवि या तरुणीला ताब्यात घेतले आहे. ती बंगळुरूतील सोलदेवानापल्ली परिसरात वास्तव्याला असून, तिथून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या टूलकिटमध्ये बदल करून आणखी मुद्दे समाविष्ट केल्याचा आणि ती पुढे पाठवल्याचा दिशावर आरोप आहे.

हवामान बदलाच्या मुद्द्यावरून ग्रेटा थनबर्गने शाळेत संप केल्यानंतर २०१८ पासून जागतिक पातळीवर हवामान बदलांविरुद्ध चळवळ उभी राहिली आहे. हवामान बदलांशी संबधित फ्रायडे फॉर फ्यूचर या अभियानाची दिशा संस्थापक सदस्य आहे. दिशाची पोलिसांनी चौकशी केली. आपण टूलकिटमध्ये बदल करून पुढे पाठवल्याची कबूली तिने दिल्याचे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.