पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीचे पोलीस महासंचालकांकडून आदेश


पुणे – इमारतीतील सदनिकेतून उडी मारून परळीतील युवतीने आत्महत्या केल्याप्रकरणात पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पुणे पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. वनमंत्री संजय राठोड यांच्यावर याप्रकरणात आरोप होत असून राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाने याप्रकरणात पुणे पोलिसांकडून चौकशीचा अहवाल मागविला आहे.

वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत आहेत. अद्याप तिच्या कुटुंबीयांकडून याप्रकरणात कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही. पोलिसांनी याप्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

अद्याप पूजाच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. इंग्रजी संभाषण कौशल्य अभ्यासक्रमासाठी पूजा पुण्यात आली होती. पूजा, तिचा चुलत भाऊ आणि एक मित्र हेवन पार्क परिसरातील सदनिकेत राहत होते. रविवारी (७ फेब्रुवारी) मध्यरात्री तिने सदनिकेतील बाल्कनीतून उडी मारली. तिचा चुलतभाऊ आणि मित्राचा याप्रकरणात जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. याप्रकरणात अद्याप तिच्या कुटुंबीयांकडून कोणतीही तक्रार नोंदविण्यात आली नाही.

दरम्यान, एक मंत्री पूजा चव्हाण आत्महत्येमागे असल्याचे मोबाइलवरील संभाषणावरून स्पष्ट झाले आहे. तरुणीचा लॅपटॉप स्कॅन केल्यास आणखी पुरावे बाहेर येतील. त्यामुळे मुख्यमंत्री आणि सरकारचे कर्तेधर्ते शरद पवार यांनी संबंधित मंत्र्यांवर कारवाई करावी. अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांना पत्र पाठविले आहे. आम्ही त्यांना तपासानंतर अहवाल पाठविणार असल्याचे परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले.