‘सामना’च्या ‘रोखठोक’ सदरातून मोदींच्या ‘आंदोलनजीवी’ शब्दावरुन संजय राऊतांनी साधला निशाणा


मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिवसेना खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत वारंवार टीकास्त्र सोडताना दिसत आहेत. त्यांनी आज ‘सामना’च्या ‘रोखठोक’ सदरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आंदोलनजीवी’ शब्दावरुन निशाणा साधला आहे. आंदोलने नकोत, मग काय हवे? लोकशाहीतील सुनसान रस्ते!’ या शीर्षकाखाली लिहिलेल्या लेखात त्यांनी म्हटले आहे की, देशातील आंदोलनाची पंतप्रधान मोदी यांनी चेष्टा केली आहे. भाजपने आणीबाणीपासून अयोध्या आंदोलनापर्यंत. महागाईपासून कश्मीरातील 370 कलम हटविण्यापर्यंत सतत आंदोलनेच केली. रामाचे आंदोलन झाले नसते तर आजचा भाजप दिसला नसता. ‘आंदोलनजीवी’ अशी खिल्ली त्या भाजपचे पंतप्रधान मोदी उडवतात तेव्हा स्वातंत्र्य चळवळीचाही अपमान होतो, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांनी पुढे म्हटले आहे की, आज ‘आंदोलना’ची पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शाह हे खिल्ली उडवत आहेत; पण साबरमती एक्प्रेस जाळल्यावर जे भयंकर गोध्राकांड झाले, त्यातूनच मोदी हे हिंदू समाजाचे नवे मसिहा बनले. मोदी यांच्या दृष्टीने गोध्राकांड हे उत्स्फूर्त आंदोलनच होते. हे आंदोलन ‘परजीवी’ असल्याचे तेव्हाचे पंतप्रधान वाजपेयी यांनी म्हटलेले नाही. मोदी व शाह यांना त्याच ‘गोध्राकांड’ आंदोलनाने दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचविल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्या मानाने दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचे आंदोलन शांत आणि सौम्य आहे. शिस्त पाळून आहे. ‘कॉर्पोरेट व्यवस्था’ आणि भांडवलदारांच्या विरोधात हे आंदोलन असल्यामुळे शेतकऱ्याला बदनाम केले जात आहे. आज शेतकऱ्यांचे आंदोलन ज्यांना नको आहे, स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास त्यांनी तपासायला हवा. शेतकरी देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात मोठ्या प्रमाणावर उतरला होता. गुजरातमध्ये वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभा केला आहे. ब्रिटिशांच्या विरोधात साराबंदी, बार्डोली सत्याग्रह शेतकऱ्यांनी केला व त्याचे नेतृत्व वल्लभभाई पटेलांनी केले. पटेलांचे फक्त पुतळे निर्माण करून काय होणार? महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्यात मोठे ‘आंदोलनजीवी’ असल्याचे संजय राऊतांनी म्हटले आहे.

पुढे त्यांनी म्हटले की, ज्या लोकशाहीतील रस्ते सुनसान असतात त्या देशाची संसद मृतप्राय होते, असे एक विधान राम मनोहर लोहिया यांनी केल्याचे आठवते. लोहियांचे बोल आज खरे होताना दिसत आहेत. दिवसेंदिवस संसद मृतप्राय होत आहे. कारण रस्ते सुनसान व्हावेत, असे फर्मान पंतप्रधान मोदी यांनी काढले आहे. देशातील आंदोलने थांबवा. आंदोलने म्हणजे परकीय शक्तीचा कट. काही लोक फक्त आंदोलनांवरच जगत आहेत. ‘आंदोलनजीवी’ असा उल्लेख करून पंतप्रधानांनी रस्त्यावर उतरणाऱ्या कार्यकर्त्यांची थट्टा केली आहे. ही थट्टा फक्त गाझीपूरला तीन महिन्यांपासून कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची नाही, तर देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाहीचे मूल्य राखण्यासाठी दीडशे वर्षांपासून आंदोलन करणाऱ्या प्रत्येकाची थट्टा असल्याचे संजय राऊतांनी लिहिले आहे.

संजय राऊत यांनी पुढे लिहिलं आहे की, गांधीजींच्या कायदेभंग, परदेशी कापडाची होळी, चले जाव, मिठाचा सत्याग्रह अशा अनेक आंदोलनांनी देश एका झेंडय़ाखाली एकवटवला, एकजिनसी केला. गांधीजींची उपोषणे हे सुद्धा आंदोलनच होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचे आंदोलन केले. अस्पृश्यांच्या अस्मितेसाठी लढा दिला. ते आंदोलन नव्हते तर दुसरे काय होते? संसदेच्या आवारात अनेक पुतळे विराजमान आहेत. त्या प्रत्येक पुतळ्याला आंदोलनाचा इतिहास आहे. तो प्रत्येक पुतळा आता जिवंत होऊन सांगत आहे, आम्ही आंदोलने केली म्हणून तुम्ही सिंहासनावर बसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी म्हटले की, दिल्लीत निर्भया बलात्कार प्रकरण घडले तेव्हा दिल्लीच्या रस्त्यांवर आणि संसदेत आंदोलन करणारे भाजपचेच लोक होते. आता एखाद्या निर्भयावर अत्याचार झाला तर ‘हाथरस’प्रमाणे तिला अंधारात पोलीस गुपचूप जाळून टाकतील व त्या घटनेचे वार्तांकन करणाऱ्यांना देशद्रोही ठरवतील. रामाचे मंदिर अयोध्येत उभे राहात आहे ते शेकडो कारसेवकांच्या बलिदानातून. हे सर्व हुतात्मे परकीय हस्तक किंवा परजीवीच होते, असेच आता म्हणावे लागेल, असं संजय राऊतांनी म्हटले आहे.