ड्रायव्हिंग करतेवेळी वापरत असाल गुगल मॅप, तर वेळीच सावध व्हा अन्यथा भरावा लागेल दंड


नवी दिल्ली : आपल्याला हव्या त्या ठिकाणी जाण्याला आजच्या युगात, एखाद्याला रस्ता विचारण्याऐवजी लोक नेव्हिगेशनद्वारे पोहचण्याला पसंती देतात. यामुळेच दिवसेंदिवस गुगल मॅपचा वापर वाढत आहे. पण तुम्ही वाहन चालविताना जर मोबाईल हातात धरुन गूगल मॅप वापरत असाल तर ते तुमच्या खिशाला भारी पडू शकते.

वाहन चालवताना सहसा लोक गुगल मॅपचे नॅव्हिगेशन चालू करतात. यामुळे मार्गाविषयी नेमकी माहिती आपल्याला मिळते. जाण्याच्या मार्गावार ट्राफीक जाम असल्यास ते देखील आधीपासूनच कळते. असे असल्यास दुसरा मार्ग चालक निवडतो. हे गुगल मॅपचे सर्व फायदे आहेत, पण त्याचबरोबर त्याचे काही तोटेही आहेत. आपण जर आपल्या कारमध्ये डॅश बोर्डावर मोबाइल बसवला नसेल आणि हातात मोबाईल घेऊन गूगल मॅप वापरत असाल तर 5 हजार रुपयांपर्यंतचे दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

दिल्लीत अलीकडेच पोलिसांनी एका व्यक्तीचे चलान कापले. कार चालकाने युक्तिवाद केला की तो कुणाशी बोलत नाही, मग त्याचे चालान का कापले गेले ?. दिल्ली पोलिसांनी यावर सांगितले की, मोबाईल होल्डरच्या वापराविना गुगल मॅप वापरणे, वाहतुकीच्या नियमांच्या विरोधात असून असे केल्याने वाहन चालविताना लक्ष विचलित होण्याची शक्यता असते. हे प्रकरण निष्काळजीपणाने वाहन चालवण्याच्या प्रकारात मोडते.

वाहन चालवताना तुम्ही गूगल मॅप वापरत असल्यास, आपल्या वाहनात यासाठी मोबाईल होल्डर बसवून घ्या. मोबाइल होल्डरमध्ये फोन ठेवून गुगल मॅप वापरणे नियम कायद्याचे उल्लंघन मानले जात नाही. दुचाकीसाठी मोबाइल होल्डर 200 रुपयांपर्यंत तर कारमध्ये 1 हजार रुपयांपर्यंत मिळतो. तुम्ही जर वेळीच होल्डर लावून घेतला तर 1 हजार रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंतचा दंड भरण्यापासून वाचू शकता.