चंद्रकात पाटलांच्या टीकेला शरद पवारांचे उत्तर


पुणे – पुण्यात बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने या आत्महत्येवरून महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपकडून या प्रकरणात नाव आलेल्या मंत्र्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. शरद पवार पूजा चव्हाण आणि धनंजय मुंडे प्रकरणावर गप्प का आहेत?, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला होता. शरद पवारांनी आता त्याला टोला लगावत प्रत्युत्तर दिले आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याचे नाव धनंजय मुंडे यांच्या प्रकरणानंतर राज्यात पूजा चव्हाण प्रकरणात चर्चिले जात आहे. त्या नेत्याचा भाजपच्या काही नेत्यांकडून थेट उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर भाजपचे नेतेही आक्रमक झालेले दिसत आहे. याच प्रकरणावरून चंद्रकांत पाटील यांनी पूजा चव्हाण आत्महत्या आणि धनंजय मुंडे प्रकरणावर शरद पवार गप्प का आहेत?,’ असा सवाल उपस्थित केला होता. शरद पवार यांना पाटलांच्या विधानाचा हवाला देत त्यांची भूमिका विचारण्यात आली. शरद पवार त्यावर म्हणाले, त्या लोकांबद्दल मी का बोलायचे ? ज्यांना आपले गाव सोडून बाहेर दुसरीकडे जावं लागते… मी त्यांच्या बद्दल काय बोलणार?, असा खोचक टोला पवारांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. पुण्यात एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूजा चव्हा प्रकरणावरून चौकशी करून कारवाई केली जाईल, असे म्हटले होते. काहींना मागील काही दिवसात आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे सखोल चौकशीनंतर कारवाई केली जाईल, असे ठाकरे म्हणाले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर मुख्यमंत्र्यांना प्रकरणाचे गांभीर्य नसल्याची टीका केली. मुख्यमंत्र्यांनी त्या ऑडिओ क्लिप्स ऐकाव्यात म्हणजे कोण आयुष्यातून उठले हे कळेल, असा सल्ला फडणवीसांना दिला आहे.