पवार कुटुंबियांचा होळकरांच्या सातबाऱ्यावर डोळा, वंशज भूषणसिंह यांची टीका


सांगली : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी पवार कुटुंबियांचा होळकरांच्या सातबाऱ्यावर डोळा असल्याचा आरोप केला आहे. जर आपण माहिती घेतली तर हे लोक जेजुरी परिसरात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे होळकरांच्या संपत्तीवर डोळा ठेवून असल्याचे दिसेल. हा उद्योग त्यासाठी सुरु असल्याचा गंभीर आरोप भूषणसिंह होळकर यांनी केला आहे. जर जेजुरी मधील कार्यक्रमाला संभाजीराजे छत्रपती जाणारच असतील तर अहिल्यादेवी पुतळ्याचे अनावरण त्यांनी करावे. जर अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते अनावरण झाले तर आम्ही त्याचे स्वागतच करू, असे होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी म्हटले आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून भूषणसिंह होळकर यांनी यावेळी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

जेजुरी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचा आडून बहुजन समाजात दुही माजवण्याचे राजकारण सुरू असून छत्रपती संभाजीराजे यांनी आज पार पडणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला जाऊ नये, अशी पत्राद्वारे विनंती केल्याचे भूषण सिंह होळकर यांनी सांगलीमध्ये बोलताना सांगितले आहे. तसेच या पुतळ्याचे अनावरण बहुजन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांच्या हस्ते होऊ नये, या गोष्टीला आमचा विरोध असून जर छत्रपती संभाजी महाराज त्या कार्यक्रमाला जाणार असतील तर त्यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणे योग्य ठरेल, त्याला आमचा विरोध असणार नाही, पण बहुजन समाजाचा राजकारणासाठी होळकर घराण्याच्या संस्कृतीचा आणि 70 वर्षांपासून वापर केलेल्या व्यक्तीकडून अनावरण झाल्यास देशभरातील बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या जातील, असेही भूषणसिंह होळकर यांनी स्पष्ट केले आहे.

अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याहस्ते अनावरण होणार आहे. या पार्श्वभूमीवर भूषण सिंह होळकर यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.