राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या जीवाला धोका


नवी दिल्ली – भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लक्ष्य करण्याची योजना पाकिस्तान स्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आखली आहे. सरदार पटेल भवन आणि राजधानी दिल्लीतील अन्य महत्त्वाच्या ठिकाणांची टेहळणी केल्याची माहिती जैशच्या दहशतवाद्याच्या चौकशीतून समोर आली आहे. त्यानंतर अजित डोवाल यांचे कार्यालय आणि घराभोवती सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अजित डोवाल यांचे सरदार पटेल भवनमध्ये कार्यालय आहे.

हे सर्व पाकिस्तानमधील हँडलरच्या सांगण्यावरुन केल्याचे जैशच्या दहशतवाद्याने सांगितले. अजित डोवाल २०१६ उरी सर्जिकल स्ट्राइक त्यानंतर २०१९ मधील बालाकोट एअर स्ट्राइकपासूनच पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या टार्गेटवर आहेत. डोवाल यांनी उरी आणि बालाकोट दोन्ही स्ट्राइकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेकांमध्ये गुप्तचर संस्थांमध्ये काम करताना भारतासाठी वेगवेगळया हेरगिरीच्या मोहिमा पार पाडणाऱ्या डोवाल यांच्याबद्दल प्रचंड कुतूहल आहे. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.

एनएसए डोवाल यांना जीवाला धोका असून सुरक्षा यंत्रणा आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला त्याबद्दल सूचित करण्यात आल्याचे या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी सांगितले. डोवाल यांच्या कार्यालय परिसराची व्हिडिओच्या माध्यमातून टेहळणी करण्यात आल्याची माहिती जैशचा दहशतवादी हिदायत-उल्लाह मलिक याच्या चौकशीतून समोर आली.

हिदायत-उल्लाह मलिक शोपियनचा रहिवाशी असून सहा फेब्रुवारीला त्याला अटक करण्यात आली. जम्मूच्या गानग्याल पोलीस ठाण्यात मलिक विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. जैशच्याच लष्कर-ए-मुस्तफाचा तो प्रमुख आहे. त्याला अनंतनागमधून अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे शस्त्रास्त्र आणि दारुगोळयाचा साठा सापडला होता.