भाजपच्या अजेंड्यावर राज्यपालांना नाचायला भाग पाडले जात आहे – शिवसेना


मुंबई – सध्या राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार असा नवीन वाद सरकारी विमान वापरण्याच्या मुद्यावरुन रंगला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मुंबई विमानतळावर गुरुवारी सरकारी विमानातून प्रवास करण्यास राज्य सरकारने परवानगी नाकारली. सकाळी मुंबई विमानतळावर डेहराडून येथे जाण्यासाठी पोहोचले व विमानात आसनस्थ झाले; परंतु विमान प्रवासासाठी राज्य सरकारची परवानगी नसल्याचे सांगण्यात आल्याने राज्यपाल १५ मिनिटांनी विमानातून उतरले.

त्यानंतर या मुद्यावरुन विरोधी पक्षात असलेल्या भाजपने सत्ताधारी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. भाजपने राज्यपालांचा हा अपमान असल्याचा आरोप केला. याच विषयावरुन आज सामनाच्या अग्रलेखातून राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे, तसेच भाजपला काही प्रश्न विचारले आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल हे सन्माननीय व्यक्ती आहेतच. पण ज्या पदावर ते सध्या विराजमान आहेत त्या पदाचा मान व प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी त्यांचीही तेवढीच आहे . भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर राज्यपालांना नाचायला भाग पाडले जात आहे व त्यात राज्यपालांचेच अधःपतन सुरू असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.

अहंकाराची भाषा भाजप नेत्यांच्या तोंडी शोभत नाही. सध्या अहंकाराचे राजकारण कोण करीत आहे ते संपूर्ण देश जाणतो. दिल्लीच्या सीमेवर दोनशे शेतकऱ्यांनी प्राणार्पण करूनही सरकार पृषी कायद्यांबाबत मागे हटायला तयार नाही. त्यास अहंकार नाही म्हणायचे तर काय? असा सवाल विचारला आहे.