मानसा वाराणसी ‘मिस इंडिया २०२०’ची विजेती


बुधवारी रात्री म्हणजे १० फेब्रुवारी रोजी मुंबईत फेमिना मिस इंडिया २०२०चा ग्रॅंड फिनाले पार पडला. मानसा वाराणसी देशातील सगळ्यात मोठ्या आणि बहुचर्चीत असलेल्या मिस इंडिया ब्युटी कॉन्टेस्ट २०२०ची विजेती ठरली आहे. तर हरियाणाची मणिका शोकंद मिस ग्रॅंड इंडिया २०२० ठरली आणि उत्तरप्रदेशची मान्या सिंह ही मिस इंडिया २०२०ची रनरअप ठरली आहे.


यंदाची मिस इंडिया स्पर्धा कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती. मिस इंडिया स्पर्धेचे हे ५७ वे पर्व होते. मुंबईतील हयात रिजेंसी हॉटेलमध्ये फेमिना मिस इंडिया २०२०चे आयोजन करण्यात आले होते. अभिनेत्री वाणी कपूर, चित्रांगदा सिंह, नेहा धुपिया, अभिनेता अपारशक्ति खुराणा आणि पुलकित सम्राट यांनी हजेरी लावली होती. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अपारशक्ति खुराणाने केले. पुलकित सम्राट आणि चित्रांगदा या फिनालेचे पॅनलिस्ट होते. तर वाणी स्टार परफॉर्मर होती. मिस इंडिया ठरलेली मानसा वाराणसी ही २३ वर्षांची असून तिने या आधी मिस तेलंगणा हा किताब जिंकला होता. फेमिना मिस इंडियाच्या खुशी मिश्रा, मान्या सिंह, मानसा, रती हुलजी आणि मणिका शोकंद या टॉप ५ फायनलिस्ट होत्या.