महाराष्ट्रात केरळहून येणाऱ्या सर्व प्रवाशांना कोरोना चाचणी अनिवार्य


मुंबई – केरळमधून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी केरळमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गदर्शकतत्वे लागू केली आहेत. आरटी-पीसीआर टेस्ट कोरोना रुग्ण शोधण्यासाठी केली जाते. यापूर्वी आरटी-पीसीआर टेस्ट गुजरात, दिल्ली-एनसीआर, गोवा आणि राजस्थानमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी अनिवार्य करण्यात आली होती.

केरळमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढली असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. सरकारचा आदेश रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्या सर्वांसाठी बंधनकारक आहे. महाराष्ट्रात हवाई मार्गाने दाखल होण्याच्या ७२ तास आधी आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागेल.

याआधी महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शकतत्वानुसार, विमानात प्रवाशांना बसण्याची परवानगी देण्याआधी त्यांचे रिपोर्ट चेक करा, अशी एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाला विनंती केली होती. तर दुसरीकडे रेल्वे मार्गाने येणाऱ्या प्रवाशांकडे ९६ तास आधीचा आरटी-पीसीआर टेस्ट रिपोर्ट असला पाहिजे.