कारागृहात असलेल्या अरुण गवळीला कोरोनाची लागण


नागपूर:- शिवेसना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी नागपूर कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात डॉन अरुण गवळी याच्यासह पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पाच जणांना एकाच वेळी कोरोनाची लागण झाल्याने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. कारागृहातीलच विलगणीकरण कक्षात सर्वांना ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून अरुण गवळीला कोरोनाची लक्षण दिसत होती. यानंतर त्याची कोरोना चाचणी केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. गवळीसोबतच इतर चार कैद्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

जुलै महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीला 28 दिवसांची फर्लो रजा मंजूर केली होती. अरुण गवळी त्याच्या काही दिवस आधीच पॅरोलची रजा पूर्ण करुन नागपूर कारागृहात परतला होता. अरुण गवळी हा यापूर्वी 8 वेळा कारागृहातून बाहेर आला आहे. सध्या नागपूर कारागृहात अरुण गवळी कैद आहे. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर जेलमध्ये त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे.