सोनिया गांधींच्या निवासस्थानाबाहेर नाना पटोले व उदयनराजेंची भेट


नवी दिल्ली – काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राज्यसभेतील भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या वर्तुळात नव्या चर्चेने डोके वर काढले आहे. नाना पटोले हे दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी असून, उदयनराजे भोसले यांनी सोनिया गांधी यांच्या निवासस्थाबाहेर पटोले यांची भेट घेतली. नाना पटोले यांनी भेटीनंतर ‘जस्ट वेट अॅण्ड वॉच..’ अशी सूचक प्रतिक्रिया दिल्याने नवी चर्चा सुरू झाली आहे.

माजी विधानसभा अध्यक्ष आणि पक्षातील नेते नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नाना पटोले नियुक्तीनंतर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या सदिच्छा भेटीसाठी दिल्लीला गेले होते. भाजपचे राज्यसभेतील खासदार उदयनराजे यांनी दिल्लीत असताना पटोले यांची सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर भेट घेतली.

या भेटीचा फोटोही समोर आला असून, त्यावरून आता राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. उदयनराजेंना सोनिया गांधी यांच्या निवासस्थानासमोरून जात असताना पटोले बाहेर दिसल्यामुळे गाडी थांबवून त्यांनी त्यांची भेट घेतली व प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले, असे इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना उदयनराजे यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे पटोले यांनी सूचक वक्तव्य केले आहे. काँग्रेसला बळकटी देण्यासाठी इतर पक्षातील नेत्यांना सामावून घेण्याच्या दिशेने काम सुरू असून ‘जस्ट वेट अॅण्ड वॉच..’ पुढे आश्चर्यकारक धक्के देऊ,” असे सूचक वक्तव्य पटोले यांनी भेटीनंतर केले आहे.