चुकीच्या खात्यात पेटीएमवरुन पैसे ट्रान्सफर झाल्यास असे परत मिळतील पैसे


मुंबई : पैसे ट्रान्सफर करण्यापासून बिल पेमेंट करण्यापर्यंत पेटीएम हे डिजिटल वॉलेट एक महत्वाचे साधन बनले आहे. पेटीएमचा छोट्या दुकानदारांपासून ते मोठ्या शोरुमपर्यंत प्रत्येक जण सर्वाधिक वापर करीत आहे. असे व्यवहार करताना अनेकदा काही तांत्रिक कारणामुळे तुमचे पेमेंट अडकते किंवा चुकीच्या खात्यात तुमच्याकडून पैसे ट्रान्सफर होतात. आपण कधी कधी एखाद्या बिलाचा भरणा करतो. आपल्या अकाऊंटमधून पैसे कट होतात. पण आपले पेमेंट झालेलेच नसते. असे झाल्यास घाबरण्याचे बिल्कुल कारण नाही.

पेटीएम पॉलिसीनुसार एखाद्या व्यक्तीला तुम्ही पैसे ट्रान्सफर केले की तुम्ही ते पैसे रिटर्न घेण्यासाठी पेटीएमकडे अधिकृत दावा करु शकत नाही. म्हणजे जर चुकीच्या खात्यात तुम्ही पैसे ट्रान्सफर केले तर यात कंपनी तुम्हाला काहीच मदत करु शकत नाही. अशा परिस्थितीत कंपनीकडे तुम्ही दावा करु शकत नाही. ते पैसे ज्या व्यक्तीच्या खात्यात गेले आहेत तीच व्यक्ती तुम्हाला पैसे रिटर्न देऊ शकते. त्या संबंधित व्यक्तीला तुम्हाला स्वतःलाच संपर्क साधून पैसे परत करण्याची विनंती करावी लागेल. संबंधित व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी प्राप्तकर्ता बँकेकडून सदर व्यक्तीची माहिती मिळवून संपर्क करु शकता.

जर त्या संबंधित व्यक्तीशी आपण संपर्क साधू शकत नसाल, तर तुम्ही 24×7 हेल्प लाईनच्या माध्यमातून पेटीएम कस्टमर सर्व्हिसशी संपर्क करा. पेटीएम त्यानंतर ज्या व्यक्तीच्या खात्यात पैसे गेले आहेत त्या व्यक्तीला केवळ विनंती करु शकते. पैसे प्राप्त झालेल्या व्यक्तीचेही पेटीएमवर अकाऊंट असेल तर पेटीएमही त्यांच्यासोबत असे करु शकते. पण कंपनी यासाठी सक्ती करु शकत नाही. पेटीएमवर पैसे प्राप्त केलेल्या व्यक्तीचे अकाऊंट नसेल तर त्या व्यक्तीचे खाते असलेल्या बँकेसोबत पेटीएम बातचीत करु शकते. बँकेने जर सहमती दिली, तर ती रक्कम तात्काळ तुमच्या खात्यात जमा केली जाईल. पण संबंधित बँकेने जरसहमती दिली नाही तर पैसे परत मिळवण्यासाठी तुमच्याकडे कायदेशीर किंवा पॉलिसी सहायता पर्याय अवलंबण्याशिवाय पर्याय नाही.