ट्विटरच्या भारतातील पब्लिक पॉलिसी हेड महिला कौल यांचा राजीनामा


मुंबई : भारतातील ट्विटरच्या पब्लिक पॉलिसी हेड महिला कौल यांनी राजीनामा दिला असून मार्च अखेरपर्यंत ट्विटरसोबत महिमा कौल काम करतील आणि त्यांची जबाबदारी निभावतील, असे ट्विटरने म्हटले आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्यावर महिमा कौल लक्ष केंद्रित करू इच्छित असल्याचेही ट्विटरने सांगितले.

ट्विटरच्या भारत आणि दक्षिण आशिया पब्लिक पॉलिसी डायरेक्टर महिमा कौल आहेत. वैयक्तिक कारणांमुळे आपल्या पदाचा त्यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती ट्विटरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. पण त्या तरीही मार्चपर्यंत आपली अधिकृत जबाबदारी पार पाडणार आहेत. ट्विटरसाठी महिमा कौल यांचा राजीनामा नुकसान आहे, पण आपल्या पाच वर्षांच्या कामानंतर जवळच्या आणि कौटुंबिक नात्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या त्यांच्या इच्छेचा आदर करतो, असे ट्विटरने म्हटले.

भारतात शेतकरी आंदोलनादरम्यान ग्लोबल सेलिब्रिटींच्या ट्विटवरून जोरदार चर्चा सुरु आहेत. त्यात महिमा यांच्या राजीनाम्याची माहिती समोर येण्याच्या टायमिंटमुळे जास्त चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने ट्विटरला शेतकरी आंदोलनादरम्यान #ModiPlanningFarmerGenocide या हॅशटॅगशी संबंधित सर्व मजकूर हटवण्याचे आदेश दिले होते. केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन केले नाही तर कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा देखील केंद्र सरकारने ट्विटरला दिला आहे.

सरकारने या संदर्भात ट्विटरला नोटिस देखील बजावली आहे. 30 जानेवारीला #ModiPlanningFarmerGenocide या हॅशटॅगचा वापर करणाऱ्या सर्व अकाऊंटवर ही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. पण आदेशाचे पालन करण्यात न आल्याने सरकारने नाराजी व्यक्त केली होती. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेच्या कामात कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहेत.

भारत ट्विटरसाठी तिसर्‍या क्रमांकाचे मार्केट आहे. अमेरिका आणि जपान अनुक्रमे पहिले आणि द्वितीय क्रमांकावर आहेत. ट्विटरचे भारतात कोट्यवधी यूजर्स आहेत, ज्यामध्ये अभिनेते, खेळाडू, सरकारी अधिकारी, राजकारणी आणि इतर व्यक्तींचा समावेश आहे.