भारत कोरोनाच्या सर्वाधिक लस देणाऱ्या अव्वल देशांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर


नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाची मोहिम देशात वेगाने सुरु असून भारत आता कोरोना लसीकरणामध्ये जगात अव्वल असणाऱ्या देशांच्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताच्या पुढे केवळ अमेरिका आणि युनायटेड किंग्डम यांचा समावेश आहे. भारतातील 12 राज्यांमध्ये प्रत्येकी 2 लाखांपेक्षा अधिक लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले आहे. 7 फेब्रुवारी सकाळी 8 वाजेपर्यंत देशभरात 57,75,322 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. यामध्ये 53,04,546 आरोग्य कर्मचारी आणि 4,70,776 फ्रंटलाईन वर्कर्सचा समावेश आहे.

8,875 केंद्रांमधून गेल्या 24 तासात 3,58,473 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. यापूर्वी लसीकरणाची 1,15,178 एवढी केंद्र झाली आहेत. रोज सातत्याने लसीकरणाच्या लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. भारतामध्ये गेल्या 24 तासात दैनंदिन मृत्यूंची संख्या 80 पेक्षा कमी नोंदविली गेली आहे, जी गेल्या 9 महिन्यातील सर्वात कमी संख्या आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 1.48 लाख एवढी आहे. तर 1.05 कोटी रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर हा 97.19 टक्के आहे.

गेल्या 24 तासात महाराष्ट्रामध्ये 1,739 एवढे रुग्ण बरे झाले आहेत. तर 2,768 नव्या रुग्णांची महाराष्ट्रात नोंद झाली आहे. गेल्या 24 तासाच 78 मृत्यूंची नोंद आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 25 मृत्यू नोंदवले गेले आहेत. दर दशलक्ष लोकसंख्येचा विचार केला तर कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यांच्या तुलनेत कोरोना वाढीचा वेग किंवा मृत्यू दर महाराष्ट्रात कमी असल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. 2 फेब्रुवारी 2021 च्या आकडेवारीनुसार दर दशलक्ष लोकसंख्येत दिल्लीत 37 हजार 844, गोव्यात 36 हजार 732, पौंडेचरीत 31 हजार 350, केरळमध्ये 28 हजार 89, चंडीगडमध्ये 19 हजार 877 एवढे कोरोनाबाधित रुग्ण होते. त्यामानाने महाराष्ट्रात यादिवशी 16 हजार 8 रुग्ण होते. राज्याचा क्रमांक यामध्ये देशात सहावा होता.