ट्रॅक्टर रॅलीत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांच्या भेटीला प्रियंका गांधी


नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत जीव गमावलेल्या नवरीत सिंग यांच्या मृत्यूनंतर देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. नवरीत सिंग यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी कॉंग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी रामपूरला रवाना झाल्या आहेत. तसेच आज राष्ट्रीय लोक दलाचे नेते जयंत चौधरी देखील सिंग त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जाणार आहे. नवरीत सिंग यांचा दहाव्याचा आज कार्यक्रम आहे. प्रियंका गांधी या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.

पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅकटर रॅलीनंतर एक व्हिडीओ शेअर केला होता. आयटीओजवळ पोलिस बॅरीकेड तोडण्याच्या प्रयत्नात असणारा एक भरधाव वेगाने येणारा ट्रॅक्टर ज्यामध्ये पलटी झाला. नवरीत सिंग यांचा या ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू झाला. सिंग यांच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालात देखील अपघात आहे. प्रियंका गांधी दिल्लीतून निघाल्या आहे. त्यांच्यासह उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष लल्लू सिंग देखील आहे. NH-24 मार्गाने त्या उत्तर प्रदेशातील रामपूर येथे जाणार आहे. त्यांच्यासह गाड्यांचा मोठा ताफा देखील आहे.

आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली दरम्यान अनेक अटींचे यावेळी उल्लघन केल्याचे सांगण्यात येते. शस्त्रे न बाळगता, निर्धारित मार्गाचा अवलंब करून आणि ट्रॉलीविना ट्रॅक्टरसह दिल्लीत प्रवेश करणे अशा काही अटींवर शेतकरी नेते आणि पोलीस यांच्यात सहमती झाली होती. पण ट्रॅक्टरच्या परेडमध्ये सहभागी असलेल्या अनेक निदर्शकांनी नियमांचे उल्लंघन केले. ट्रॅक्टरवर पाच पेक्षा जास्त लोक बसणार नाहीत, या अटीचेही उल्लंघन आंदोलक शेतकऱ्यांनी केल्यामुळे हा ट्रॅक्टर मार्च हिंसक झाला आणि यावेळी अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली.