आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आमदार शशिकांत शिंदे यांना जाहीर धमकी


सातारा – आमदार शशिकांत शिंदे यांना साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी जाहीर धमकी दिली असून त्यांनी शशिकांत शिंदे यांना माझी वाट लागली तरी चालेल, माझे सर्व संपले तरी चालेल पण मी त्याचे सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नसल्याचे म्हणत आव्हान दिले आहे. ते साताऱ्यातील जावळी येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

माझी वाट लागली तरी चालेल, माझे सर्व संपले तरी चालेल पण मी त्याचे सर्व संपवल्याशिवाय शांत राहणार नाही. मला माझ्या मागे कोणी त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल, तर मी पण संपेन आणि समोरच्यालाही संपवणार ही आपली भूमिका आहे. जर कोणी आपला काटा काढत असेल तर मग काट्याने काटा काढायचा हीच आपली भूमिका स्पष्ट आहे. याबाबतीत मी पण मागे फिरणाऱ्यातील नाही. कोणी जर आडवेपणा करत असेल तर मी पण स्वभावाने आडवा माणूस आहे. मी कोणाला घाबरत नाही. शेवटी मी उदयनराजेंच्या विरोधात विधानसभा लढवून निवडून आलेला माणूस आहे.

भाजपमध्ये शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचा गड राखण्यासाठी शशिकांत शिंदे प्रयत्न करत असून त्यातून राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. त्यातच शिवेंद्रराजे यांनी दिलेले हे आव्हान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.