दुसऱ्या पत्नीच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचा खुलासा


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. पण त्या महिलेने बलात्काराची तक्रार मागे घेतल्यामुळे धनंजय मुंडेंना दिलासा मिळाला असतानाच आता त्यांच्यासमोर एक नवे संकट उभे राहिले आहे. मुंबई पोलीस आयुक्तांकडे धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करूणा यांनी तक्रार केली आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या मुलांना चित्रकूट बंगल्यात मागील तीन महिन्यांपासून डांबून ठेवल्याचा गंभीर आरोप करुणा यांनी केला आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांनी त्यांच्या या आरोपांवर खुलासा केला आहे.

माझ्या दोन मुलांना माझे पती धनंजय मुंडे यांनी मागील तीन महिन्यांपासून जबरदस्ती आपल्या बंगल्यात बंद करून ठेवले आहे आणि मला त्यांना भेटू दिले जात नाही. त्यांच्याशी फोनवर देखील मला बोलू दिले जात नाही. मी २४ जानेवारी २०२१ रोजी जेव्हा मुलांना भेटण्यासाठी चित्रकुट बंगल्यावर गेले, तेव्हा धनंजय मुंडे यांनी पोलिसांना बोलावले व मला मुलांना भेटू दिले नाही. तरी विधानसभेतून धनंजय मुंडे यांना तात्काळ निलंबित केले जावे आणि भविष्यात कोणतीही निवडणूक लढण्यासाठी त्यांना अयोग्य घोषित केले जावे. धनंजय मुंडे यांच्या चित्रकूट बंगल्यावर माझी मुले सुरक्षित नाहीत. माझी लहान मुलगी असून ती १४ वर्षांची आहे व बंगल्यावर कुणी महिला केअरटेकर देखील नाही. धनंजय मुंडे यांची वागणूक चांगली नाही. दोन्ही मुलांना माझ्या विरोधात भडकवले जात असल्यामुळे माझ्या मुलांबरोबर काही वाईट घडले तर, त्यासाठी धनंजय मुंडे जबाबदार असतील. मला माझ्या मुलांना भेटू द्यावे. अन्यथा मी २० फेब्रुवारीपासून आमरण उपोषणास बसेन.

दरम्यान श्रीमती करुणा शर्मा यांनी पोलिसात तक्रार केल्याच्या बातम्या आज पुन्हा काही माध्यमात माझ्याविरुद्ध प्रसिद्धीस येत आहेत. मी याबाबत खुलासा करू इच्छितो की, श्रीमती करुणा शर्मा यांच्या बाबतीत मी पूर्वीच खुलासा केला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या वादात मी स्वतःहून उच्य न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

उच्च न्यायालयाने श्रीमती करुणा शर्मा यांना सदर याचिकेत मना आदेशही दिला आहे. (इंजंक्शन) त्यानंतर विवादावर तोडगा काढण्यासाठी दोघांनी सहमतीने मेडिएटर नेमण्याची विनंती केल्यावरून उच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीश श्रीमती ताहिलरामानी यांची मेडिएटर म्हणुन नियुक्तीसुद्धा केली आहे. सदर मेडिएशनच्या दोन बैठका झालेल्या असून पुढील बैठक १३ फेब्रुवारी २०२१ रोजी निश्चित झालेली आहे. या मेडिएशनमध्ये मुलांच्या संदर्भातील सर्व विवादासह इतर सर्व मुद्दे चर्चेत व निर्णयार्थ असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

ते पुढे म्हणाले की, असे असताना आणि सहमतीने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिवरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्यांसमोर मेडिएशनची प्रक्रिया सुरु असताना अशाप्रकारे मुलांच्या ताब्यावरून तक्रार करणे हेतूबद्दल शंका निर्माण करणारे आहे. जो मुद्दा मुळात मेडिएशनमध्ये चर्चेत आहे त्याबद्दल जाहीर मागणी करणे म्हणजे समोरच्या विरोधी पक्षास न्यायिक प्रक्रियेत काहीही रस नसुन निव्वळ मीडिया ट्रायल चालवून बदनामी करणे हाच हेतू दिसून येतो.

सदर बाब हि न्यायप्रविष्ठ असून जो निर्णय न्यायालयीन प्रक्रियेअंती होईल, तो सर्वांवर बंधनकारकच असणार आहे. यामुळे या प्रकरणात निव्वळ बदनामी करण्याच्या हेतूने करण्यात येत असलेल्या अशा आरोपात काहीही तथ्य नाही. कृपया ही वस्तुस्थिती व न्यायालयीन प्रकरण व एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्यातील बाब लक्षात घेऊन वृत्त देताना सामाजिक जीवनातील व्यक्तीची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी विनंती धनंजय मुंडे यांनी केली आहे.