दयाबेनने सुरु केली ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची शूटिंग?


छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय असलेल्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्री दिशा वाकानीनेदेखील या मालिकेत दयाबेनची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. दिशा या शोमुळे घराघरात लोकप्रिय झाली. पण दिशा वाकानी गेल्या काही वर्षांपासून मालिकेतून गायब आहे. चाहते तिच्या पुनरागमनाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. पण सोशल मीडियावर सध्या दिशाने मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

सध्या सोशल मीडियावर दिशा वकानी नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजने केलेली पोस्ट व्हायरल झाली आहे. दिशा वकानी पुन्हा मालिकेत दिसणार आहे आणि तिने मालिकेचे चित्रीकरण सुरु केल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे. ही पोस्ट पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे. पण अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. तर काही लोकांनी दिशाला सुनावले आहे. एका यूजरने आणखी किती दिवस तू लोकांच्या भावनांशी खेळणार असल्याचे म्हटले आहे.

मालिकेत दया बेन ही गेल्या काही दिवसांपासून माहेरी गेल्याचे दाखवण्यात आले होते. पण नुकताच पार पडलेल्या एका भागामध्ये दया बेन लवकरच येणार असल्याची हिंट देण्यात आल्यामुळे सोशल मीडियावर दिशाची पुन्हा एण्ट्री होणार या चर्चांना उधाण आले आहे. पण अद्याप कोणतीही अधिकृत माहिती याबाबत समोर आलेली नसल्यामुळे दिशा वकानी मालिकेत कमबॅक करते का, हे आगामी काळातच स्पष्ट होईल.