नाना पटोले यांनी दिला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा


मुंबई – विधानसभा अध्यक्षपदाचा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राजीनामा दिला असून राजीनामा राज्याच्या विधानसभा उपाध्यक्षांकडे सुपूर्द केल्याची माहिती खुद्द नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी त्यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले. मी त्याचे पालन करुन माझ्या पदाचा राजीनामा विधानसभा उपाध्यक्षांकडे सपूर्द केला असल्याचे नाना पटोले म्हणाले. त्यांना नव्या जबाबदारीबाबत विचारले असता नाना पटोले यांनी मला नव्या जबाबदारीबाबत अजूनपर्यंत काही कळविण्यात आलेले नाही. मला फक्त विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश हायकमांडकडून आले आहेत, त्याचे मी फक्त पालन केल्याचे पटोले म्हणाले.

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे आता नवा विधानसभा अध्यक्ष कोण होणार? याची चर्चा सुरू झाली आहे. पुढचा विधानसभा अध्यक्ष काँग्रसेचाच असणार का? याबाबत विचारले असता याबाबत महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांचे महत्वाचे नेते याबाबत बैठक घेऊन निर्णय घेतील, असे पटोले म्हणाले.

गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदाचा प्रश्न रखडला होता. स्वत:हून प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही दाखवल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांची नावे चर्चेत आहेत. पण आता नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे प्रदेशाध्यक्षपदासाठी पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.