अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून शिष्यवृत्ती – धनंजय मुंडे


मुंबई – यंदा शाळा कोरोनामुळे सुरु होण्यास नवीन वर्षच उलटले, तर अद्यापही महाविद्यालये सुरुच न झाल्यामुळे विद्यार्थ्यांची शाळा आणि महाविद्यालयातील 75 टक्के उपस्थिती शक्य होणार नाही. त्यामुळे, विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती मिळण्यास अडचण निर्माण होणार होती. पण मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनांचा लाभ विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरुन देण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी दिली आहे.

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यास अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील जे विद्यार्थी पात्र आहेत, व डिजिटल पद्धतीने जे सन २०२०-२१ मध्ये शिक्षण घेत आहेत, त्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून यावर्षीच्या शिष्यवृत्तीचा लाभ देण्याचे निर्देश समाज कल्याण आयुक्तांना देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना सन २०२०-२१ मध्ये ७५% उपस्थितीचा आवश्यक टप्पा गाठणे शक्य होणार नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. विविध शिष्यवृत्ती, विद्यावेतन योजनेतील लाभार्थी विद्यार्थ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात येईपर्यंत ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येईल, असेही मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितले आहे.

लॉकडाऊननंतर मिशन बिगेन अगेनअंतर्गत अनेक क्षेत्र सुरु करण्यात आली आहेत. पण महाविद्यालयीन शिक्षण अद्यापही प्रत्यक्षपणे सुरु झाले नसून ऑनलाईन पद्धतीनेच सुरू आहे. विद्यार्थ्यांची प्रत्यक्षातील उपस्थिती यंदा राज्य सरकारने शिथील केल्यामुळे सन 2020-21 या वर्षांसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता, शिष्यवृत्ती फ्री शीप, देशांतर्गत शिष्यवृत्ती, विद्यावेतन व इतर शिष्यवृत्ती योजनांच्या लाभाकरीता विद्यार्थांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरावी. तसेच, पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची अनुज्ञेय रक्कम मंजूर करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून देण्यात आले आहेत. धनंजय मुंडेंनी आपल्या अधिकृत ट्विटरवरुन या आदेशाची प्रत शेअर केली आहे.