राजकारणात सक्रीय झालेल्या अमित ठाकरेंच्या खांद्यावर नवी जबाबदारी


मुंबई : पुढील वर्षी मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे असून त्यासाठी आतापासूनच सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याचाच भाग म्हणून पक्षात काही बदल केले आहे. त्याचबरोबर राजकारणात सक्रीय झालेले अमित ठाकरे यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मनसेच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आज मुंबईमध्ये पार पडली. या बैठकीत पक्ष संघटना आणि नव्याने बांधणी याबद्दलही चर्चा झाली आहे. तसेच मुंबई निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकसभा निहाय 1 नेता आणि 1 सरचिटणीस अशी टीम तयार करण्यात आली आहे. त्या लोकसभेत जाऊन ही कमिटी आढावा घेणार आहे. अमित ठाकरे हे मागील वर्षी सक्रिय राजकारणामध्ये सहभागी झाले होते. अमित ठाकरे यांची मागील वर्षी 23 जानेवारी रोजी मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली.

आता अमित ठाकरे यांच्यावर आगामी निवडणुकांसाठी उत्तर-पूर्व भागातील जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अमित यांच्यासोबत संदीप देशपांडे हे सुद्धा असणार आहेत. तर दक्षिण मुंबईची जबाबदारी नितीन सरदेसाई आणि मनोज चव्हाण यांच्यावर देण्यात आली आहे.

मनसेकडून जी टीम तयार करण्यात आली आहे, ती आपआपल्या भागात जाऊन पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेतील आणि त्याचा अहवाल तयार करून, तो राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याची माहिती नितीन सरदेसाई यांनी दिली. आपल्या भागातला अहवाल या टीम 25 फेब्रुवारीपर्यंत राज ठाकरे यांना देण्यात येणार आहे. याच प्रमाणे मुंबई बाहेर ठाणे, पुणे, नाशिक,कल्याण डोंबिवली यासाठी टीम तयार केली जाणार आहे.