मुंबई महानगरपालिकेने सादर केला ३९ हजार ३८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प


मुंबई – सन २०२१-२२ साठीचा अर्थसंकल्प आज मुंबई महानगरपालिकेने सादर केला असून महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाकडे कोरोना आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष लागले होते. यंदा मुंबई महानगरपालिकेने ३९ हजार ३८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. मुंबई महानगरपालिकेचा गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प ३३ हजार ४४१ कोटी एवढा होता. त्यात यावेळी १६.७४ टक्क्यांची वाढ झाली आहे.

पालिकेचा अर्थसंकल्प मुंबईचे महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सादर केला. यावेळी सर्वसामान्य मुंबईकरांचे मालमत्ता करात सरसकट माफी मिळणार का? याकडे लक्ष लागून राहिले होते. पण त्यासंदर्भात कोणतीही घोषणा महानगरपालिकेकडून करण्यात आलेली नाही. सध्या मालमत्ता करातील सर्वसाधारण करच माफ आहे. इतर नऊ प्रकारचे कर लागू आहेत. त्यानुसारच तूर्तास २०१९-२० प्रमाणेच मालमत्ता कराची बिले पाठवण्यात येत आहेत. त्यामध्ये वाढ करण्यात आलेली नाही.

मुंबई महानगरपालिकेला मालमत्ता करातून ६७६८.५८ कोटी उत्पन्न मिळणे अपेक्षित होते. पण आता सुधारित अर्थसंकल्पानुसार साडेचार हजार कोटी पालिकेच्या तिजोरीत जमा होतील, असे चहल यांनी यावेळी सांगितले. मालमत्ता कराच्या उत्पन्नात सन २०२० – २०२१ या आर्थिक वर्षात २२६८.५८ कोटींची घट झाली आहे. उत्पन्नाचे दुसरे प्रमुख स्त्रोत असलेल्या विकास नियोजन खात्यातून ३८७९.५१ कोटी उत्पन्न अपेक्षित होते. पण केवळ ११९९.९९ कोटी उत्पन्न आतापर्यंत जमा झाले आहे. महानगरपालिकेला एसआरएकडून जमीन अधिमूल्य पोटी ६१८ कोटी व पायाभूत सुविधा विकास आकारामुळे ९८२ कोटी येणे आहे. तसेच राज्य शासनाकडून विविध कार्यालयांकडून ५२७४ कोटी येणे बाकी असल्याचीही माहिती चहल यांनी दिली.

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

  • लवकरच नायर रुग्णालयात उपलब्ध करून देणार १.५ टेस्ला एमआरआय सुविधा; १७ ते २० कोटींची तरतूद
  • कोविड फंडातून लिक्विड ऑक्सिजन टॅंक उपलब्धतेसाठी ४०.३० कोटींची तरतूद
  • घरातच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासण्या करण्यासाठी विशेष धोरण – पाच कोटी रुपयांची तरतूद
  • २० कोटींची तरतूद नर्सिंग प्राध्यापक संवर्गातील मनुष्यबळाच्या उपलब्धतेसाठी
  • १०० टक्के बालकांचे संसर्गजन्य रोगांसाठी २०३० पर्यंत लसीकरण करणार
  • कस्तुरबा रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यात येणार
  • अग्नी व जीव संरक्षण व्यवस्था या अनुषंगाने नवीन इमारतींना परवानगी देण्याकरिता महानगरपालिकेतर्फे छाननी शुल्क आकारले जाते. मोठ्या प्रमाणात या शुल्कात सुधारणा करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या विचाराधीन
  • ३० कोटी रुपयांचा निधी देवनार पशुवध गृहाच्या आधुनिकीकरणासाठी
  • दोन हजार कोटी कोस्टल रोडसाठी, १३०० कोटी गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यासाठी, एक हजार 119 कोटी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात कचऱ्यापासून वीजनिर्मिती करिता
  • 1339. 94 कोटी सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी, २२९.५० कोटी मोठ्या जलवाहिन्यांची कामे, मिठी नदी प्रकल्पासाठी ६७ कोटी एवढी तरतूद करण्यात आली आहे
  • महानगरपालिकेने आगामी आर्थिक वर्षात आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमासाठी ७५० कोटींची तरतूद