एमपीएससीच्या प्रदीप कुमारांची मराठा आरक्षणविरोधी याचिकाप्रकरणी उचलबांगडी


मुंबई : सर्वोच्च न्यायालयात एमपीएमससीमार्फत ठाकरे सरकारला अंधारात ठेवून मराठा आरक्षणविरोधी परस्पर याचिका दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याची उचलबांगडी करण्यात आली आहे. एमपीएससीच्या प्रदीप कुमार यांना हटवून त्यांच्या जागी स्वाती म्हसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असतानाच परस्पर याचिका एमपीएससीने दाखल केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह अनेक मंत्र्यांनी या प्रकारानंतर नाराजी व्यक्त केली होती. सरकारला अंधारात ठेवून सर्वोच्च न्यायालयात एमपीएससीने परस्पर याचिका दाखल करुन एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांची निवड रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु एमपीएससीने वकिलांना आता ही याचिका मागे घेण्यास सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला 9 सप्टेंबर 2019 रोजी स्थगिती दिली. त्याच्या आधीच्या मराठा आरक्षण लाभावर परिणाम होणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने तेव्हा म्हटले होते. पण एमपीएससीच्या काही जागाचे निकाल जाहीर होऊन नियुक्त्या देणे बाकी होते. कोरोनामुळे या नियुक्त्या रखडल्याने काही विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात आमच्या नियुक्त यांना परवानगी द्यावी ही याचिका या विद्यार्थ्याने दाखल केली आहे. त्यावेळी सरकारने तुमच्या सोबत राहू असा विश्वास दिला होता. पण त्याच वेळी एमपीएससीने दुसरी याचिका न्यायालयात दाखल केली होती. हा निकाल रिवाईज करण्याची ज्यात परवानगी मागितली होती. त्यासाठी या निकालतला मराठा आरक्षण लाभ वगळण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाकडे एमपीएससीने मागितली होती.