शेतकरी आंदोलनाचे पॉपस्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्गकडून समर्थन


नवी दिल्ली – शेतकरी मागील 70 दिवसांपासून केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याच्या निषेधार्थ आंदोलन करत आहेत. आता शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ जागतिक सेलिब्रिटीही आवाज उठवत आहेत. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पॉप स्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी ट्विट केले आहे. आपल्या ट्विटरवर रिहानाने शेतकरी चळवळीशी संबंधित बातम्या शेअर करत लिहिले आहे की आम्ही याबद्दल बोलत का नाही? त्याचबरोबर पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने म्हटले आहे की भारतातील शेतकऱ्यांच्या निदर्शनात आम्ही एकजूटीने उभे आहोत.


काल संध्याकाळी शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी संबंधित एक बातमी कॅरेबियन पॉप स्टार रिहानाने शेअर केली. शेतकऱ्यांच्या निदर्शनाच्या जागेभोवती इंटरनेट बंद करण्याविषयी ही बातमी होती. ही बातमी रिहानाने शेअर केली आणि लिहिले की, आपण याबद्दल का बोलत नाही? रिहानाने हे ट्विट #FarmersProtest या हॅशटॅगसह केले.


पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गनेही रिहानाच्या ट्विटनंतर शेतकरी आंदोलनाविषयी ट्विट केले. ग्रेटाने ट्विटरवर लिहिले की, आम्ही भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलकांसोबत एकतेने उभे आहोत. 2019 मध्ये अमेरिकन मॅगझिन टाईम्सने ग्रेटा थनबर्गला ‘पर्सन ऑफ द इयर’ म्हणून घोषित केले होते. ज्यावेळी ग्रेटा चर्चेत आली होती त्यावेळी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी तिची शाब्दिक चकमक झाली होती.