‘बिग बॉस’चे वादग्रस्त स्पर्धक स्वामी ओम यांचे निधन


‘बिग बॉस’च्या दहाव्या पर्वातील वादग्रस्त स्पर्धक ओम स्वामी यांचे निधन झाले आहे. आपल्या निवासस्थानी डीएलएफ अंकुर विहार येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सगळ्यात वादग्रस्त समजला जाणाऱ्या ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होणारा प्रत्येक स्पर्धकाला एक वेगळी ओळख मिळते. स्वामी ओम ‘बिग बॉस १०’ सिझनमध्ये सर्वसामान्य स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना ‘बिग बॉस’ या शोमुळे प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. स्वयंघोषित बाबा स्वामी ओम प्रचंड वादग्रस्तही ठरले होते.

तीन महिन्यांपूर्वी त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती, त्यानंतर त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याची माहितीस समोर येत आहे. त्यांची प्रकृती त्यानंतर अधिकच खालावत गेली. त्यांच्यावर उपचारही सुरु होते. पण त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. बिग बॉस शोमधून बाहेर आल्यानंतर स्वामी ओम चर्चेत होते.