सिल्वर ओकवर ठाकरे सरकारचा रिमोट कंट्रोल – महादेव जानकर


पंढरपूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची महाविकास आघाडी सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका पाहता ही बाब अनेकांच्याच नजरेत आली. त्यातच आता राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनीही सध्या अशाच आशयाचे एक वक्तव्य करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

आता मातोश्रीवर राज्य सरकारचा रिमोट कंट्रोल नसून तो सिल्वर ओककडे गेला आहे आणि शरद पवार हे सरकार चालवत असल्याचा घणाघात रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला. पंढरपूरमध्ये मंगळवारी पक्षाच्या कार्यक्रमाला आले असताना त्यांनी हे वक्तव्य केले. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी फडणवीस सरकारने दिलेले एक हजार कोटींचा निधी ठाकरे सरकारने द्यावा, मराठा आणि धनगर आरक्षणांच्या प्रश्नावर न्यायालयात होणार खर्च ठाकरे सरकारने उचलावा अशी मागणी त्यांनी केली.

सध्या वडेट्टीवार यांनी ओबीसींच्या प्रश्नावर घेतलेली भूमिका योग्य असून न्यायालयाच्या निकालाची मराठा आणि ओबीसी तरुणांनी प्रतीक्षा करावी, आणि तोपर्यंत डोकी थंड ठेवा, असे आवाहनही जानकरांनी केले. दरम्यान, यावेळी त्यांच्या वक्तव्यातून भाजपवरील नाराजीही व्यक्त झाल्याचे पाहायला मिळाले. जिथे वीज बिल आंदोलनातून भाजपने माघार घेतली पण. किती दिवस भाजपच्याच पाठीवर बसू जायचे, कारण आपला पक्षही एक राष्ट्रीय पक्ष आहे, त्याचेही अस्तित्व असल्याचे म्हणत भाजपपासून अंतर ठेवण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. एकिकडे महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधत आणि दुसरीकडे भाजपवरील नाराजी स्पष्ट शब्दांत व्यक्त करत जानकरांनी सर्वांचेच लक्ष वेधले आहे.