ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’च्या सेटला भीषण आग


मुंबई: मंगळवारी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारांस गोरेगाव पश्चिममधील बांगुल नगर येथील मोकळ्या जागेत उभारण्यात आलेल्या एका चित्रीकरणाच्या सेटला भीषण आग लागली. सेटमधील सर्व सामान या आगीत जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर तब्बल एक तासांच्या ही आग नियंत्रणात आली आहे.

मंगळवारी मुंबईत ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या सेटला आग लागल्याची घटना घडली. मुंबईत ओम राऊत यांच्या दिग्दर्शनात साकारल्या जाणाऱ्या या चित्रपटाच्या क्रोमा शूटसाठी सेट लावण्यात आला होता. येथे अभिनेता सूर्या हा एका दृश्याचे चित्रीकरण करत होता, तेवढ्यातच सेटला आग लागली. आगीची माहिती मिळताच सेटवरील ५० ते ६० कलाकार आणि कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्यामुळे मोठी हानी टळली.

अद्याप आगीचे कारण समोर आले नसून या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या सेटवर खुर्च्या आणि इतर फर्निचर असल्यामुळे आगीने लाकडी सामानाला तात्काळ पेट घेतला. त्यातच सोसायट्याचा वारा सुटल्याने ही आग अधिकच भडकली. बघता बघता आगीने उग्ररुप धारण केले. आग आणि धुराचे लोट पसरल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती.