संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांचा कृषी कायद्यावरून गदारोळ; कामकाज तहकूब


नवी दिल्ली : काल देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केल्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे नियमित कामकाज सुरू झाले. पण, कृषी कायद्याविरोधात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहातील कामकाज वारंवार तहकूब करावे लागले.

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांनी राज्यसभेचे कामकाज सुरू होताच शेतकऱ्यांच्या मुद्यांवर चर्चा व्हावी, यासाठी नोटीस दिली. तर स्थगन प्रस्ताव बहुजन समाज पक्षाचे सदस्य अशोक सिद्धार्थ यांनी दिला. पण, सभापती वैंकय्या नायडू यांनी उद्या शेतकऱ्यांच्या मुद्यावर चर्चा होईल, असे स्पष्ट केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करण्यावर सहमती झाल्याचेही त्यांनी सांगितले. विरोधी बाकावरील सदस्य मात्र चर्चेच्या मुद्यावर ठाम राहिले आणि सभात्याग केला.

विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मुद्यावरून जोरदार घोषणाबाजीही केल्यानंतर राज्यसभेचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले. राज्यसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिला. तीनवेळा कामकाज तहकूब केल्यानंतर अखेर साडेबारा वाजता राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. आता उद्या (बुधवारी) सकाळी नऊ वाजता राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात येणार आहे.

कृषी कायद्याविरोधात राज्यसभेप्रमाणे लोकसभेतही सदस्यांनी शेतकरी आंदोलनाचा मुद्दा उचलून धरला. लोकसभेतही अनेकदा कामकाज तहकूब करावे लागले. दरम्यान, काँग्रेसच्या संसदीय समितीची बैठक पार पडली. यामध्ये शेतकऱ्यांच्या मुद्यावरून स्थगिती प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे आता संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषि कायद्याचा प्रश्न चांगलाच तापणार असल्याचे पाहायला मिळू शकेल, असे सांगितले जात आहे.