निलेश राणेंची संजय राऊत यांच्यावर एकेरी भाषेत टीका


मुंबई : राजधानी दिल्लीच्या विविध सीमांवर मागील दोन महिन्यांपासून केंद्रीय कृषि कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत. आज (मंगळवारी) दुपारी दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर जाऊन शिवसेना खासदारांच्या एका शिष्टमंडळाने शेतकऱ्यांची भेट घेतली. शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांचाही यामध्ये सहभाग होता. यानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. यासंदर्भात भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार टीका केली असून, संजय राऊत एक नंबर ढोंगी असल्याचे म्हटले आहे.


एक ट्विट करत संजय राऊत यांच्यावर निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटमध्ये निलेश राणेंनी म्हटले आहे की, संज्या राऊत जितका झटपट दिल्ली येथील आंदोलनाच्या ठिकाणी फोटो काढायला गेला तसाच कधी मराठा आंदोलकांना भेटला नाही. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही आंदोलनाला संज्या कधी गेला नाही, महाराष्ट्रातले आंदोलनकारी नको फक्त महाराष्ट्र हे नाव पाहिजे राजकारण करायला… एक नंबर ढोंगी आहेत, अशा शब्दांत निलेश राणे यांनी सडकून टीका केली आहे.