केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दिल्ली पोलीसांचे समर्थन; आंदोलक शेतकऱ्यांवरील कारवाई योग्यच


नवी दिल्ली – मागच्या दोन महिन्यांपासून कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली दरम्यान हिंसाचार केला. त्यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आंदोलकांविरोधात जी कारवाई केली, त्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने समर्थन केले आहे. दुसरा पर्याय पोलिसांकडे शिल्लक राहिला नव्हता, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे.

दिल्ली पोलिसांसमोर शेतकऱ्यांच्या कृतीमुळे दुसरा पर्याय नव्हता. अश्रू धुराच्या नळकांड्या त्यांनी फोडल्या, पाण्याचे फवारे मारले व जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी बळाचा वापर केल्याचे संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्रालयाने सांगितले.

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान करण्यात आले नाही. कोरोनाचे निर्बंध असतानाही, चेहऱ्यावरील मास्कशिवाय मोठया प्रमाणावर शेतकरी जमा झाल्याचे गृहमंत्रालयाने म्हटले आहे. सरकारी मालमत्तेचे शेतकरी नुकसान करत होते, त्यावेळी दुसरा पर्याय पोलिसांकडे उरला नसल्याचे गृहमंत्रालयाने ट्रॅक्टर मोर्चा दरम्यान पोलिस कारवाईच्या प्रश्नावर सांगितले.