फडणवीस सरकारमधील एका नेत्यामुळे खूप त्रास झाला – डॉ. लहाने यांचे स्पष्टीकरण


मुंबई – नेत्रतज्ज्ञ व वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सरकारने नव्हे तर भाजपाच्या एका मंत्र्यामुळे खूप त्रास झाल्याचे स्पष्टीकरण दिले असून डॉ. लहाने यांना वंजारवाडी येथे संत वामनभाऊ व भगवानबाबा प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आलेला समाजभूषण पुरस्कार समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी केलेल्या भाषणात भाजपच्या एका मंत्र्याने त्यावेळी आपल्याला त्रास दिला असल्याचे आपले म्हणणे होते. त्याऐवजी फडणवीस सरकारने त्रास दिल्याचे वृत्त आल्याचे डॉ. लहाने म्हणाले.

आपल्याला कायमच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून गिरीश महाजन यांनी पाठिंबा दिला व सहकार्य केले. तेव्हाचे विरोधी पक्षनेते व आताचे मंत्री धनंजय मुंडे हेही कायम आपल्या पाठीशी उभे होते. ‘नेत्रदानाचा महायज्ञ’ ही संकल्पना फडणवीस सरकारच्या काळात राबविता आली. तसेच अनेक उपक्रम नेत्रतज्ज्ञ म्हणून राबविता आल्याचे डॉ लहाने यांनी यावेळी सांगितले. एका मंत्र्यामुळे आपल्याला फडणवीस सरकारच्या सुरुवातीच्या काळात त्रास झाला होता. पण तेव्हाही देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन माझ्या पाठीशी उभे होते, असे डॉ. लहाने यांनी यावेळी सांगितले.