राऊतांनी मुलीच्या साखरपुड्यात फडणवीसांची घेतली गळाभेट, चंद्रकांतदादा म्हणाले…


मुंबई – शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या मुलीचा साखरपुडा काल पार पडला. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही यावेळी आमंत्रित करण्यात आले होते. संजय राऊतांनी यावेळी फडणवीस यांची गळाभेट घेतली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या गळाभेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील यांना राऊत आणि फडणवीस यांच्या, या गळाभेटीसंदर्भात विचारले असता ते म्हणाले, आपल्या देशाची संस्कृती आहे, जरी शत्रू असला तरी तो त्या नावाच्या जागी. एरवी आपण एकमेकांना खूप प्रेम देतो. त्यामुळे संजय राऊत यांच्या मुलीच्या साखरपुड्याला देवेंद्र फडणवीस यांनी जायलाच हवे होते आणि स्वाभाविकपणे दोन मित्र भेटल्यानंतर त्यांचे राजकीय विचार वेगळे असले तरीही, आपण प्रेमाने मिठी मारतोच.

ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा मुलगा मल्हार यांच्याशी संजय राऊतांची मुलगी पूर्वशी हिचा साखरपुडा झाला आहे. विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, हे या कार्यक्रमाला सोबतच पोहोचले होते. नार्वेकर यांनी यावेळी फडणवीसांना नमस्कार केला. फडणवीसांनी पुढे होऊन मल्हार आणि पूर्वशी यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. त्याच वेळी दुसऱ्या बाजूला असलेले संजय राऊत फडणवीसांकडे आले आणि त्यांची गळाभेट घेतली.

राऊत आणि फडणवीस यांच्या चेहऱ्यावर या गळाभेटीदरम्यान खास हास्यही दिसून आले. मल्हार आणि पूर्वशी यांच्यासोबत यानंतर नार्वेकर आणि राऊत कुटुंबियांसह फडणवीसांनी फोटोही काढले. यानंतर दरेकर यांनी मल्हार आणि पूर्वशीला पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या.