विरुष्काने घातले लेकीचे बारसे; ठेवले हे नाव


मागील महिन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याची पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने गोंडस कन्येला जन्म दिला होता. त्यानंतर विरुष्काच्या लेकीचे नाव काय असेल, याची सर्वांनाच उत्सुकता होती आणि अनुष्काने सोमवारी लेकीसोबतचा फोटो पोस्ट करून तिचे नाव जाहीर केले. विराट आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मावेळी हजर असावे यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतला होता. भारताचे क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, आर अश्विन आणि रोहित शर्मा या सर्वांना मुलगी आहे आणि त्यांच्या क्लबमध्ये विराटचा समावेश झाला आहे.


एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान विराट आणि अनुष्का यांची पहिली भेट झाली होती. दोघे त्यावेळी जाहिरातीचे शूटिंग करत होते. विराटने त्यापूर्वी कोणत्या अभिनेत्रीसोबत काम केले नव्हते. त्यामुळे तो सेटवर अनुष्का शर्मासमोर खूप नर्व्हस झाला होता. विराट आणि अनुष्कामध्ये या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान फ्रेंडशिप झाली आणि मग ते दोघे एकमेकांना भेटू लागले. दोघांनी काही कालावधीपर्यंत एकमेकांना डेट केले आणि 2017 साली दोघांनी इटलीत लग्न केले. दरम्यान सोमवारी तिघांचा फोटो अनुष्काने पोस्ट केला आणि वामिका असे तिने लेकीचे नाव ठेवल्याचे जाहीर केले.