म्यानमारमध्ये आंग सान सू की यांच्यासह राष्ट्राध्यक्षांना अटक, आणीबाणीची घोषणा


नेपयितव – म्यानमारमधील लष्कराने सत्तापालट घडवून आणला असून आपल्या हातात सत्ता घेतली आहे. लष्कराकडून म्यानमारच्या लोकशाहीवादी सर्वोच्च नेत्या आंग सान सू की यांच्यासह देशाचे राष्ट्रपती विन म्यिंट आणि सत्तारुढ पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी सकाळी झालेल्या एका छाप्यादरम्यान करण्यात आल्याचे नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी (एनएलडी) या पक्षाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

सरकार आणि देशाच्या लष्करादरम्यान नुकत्याच झालेल्या निवडणुकांदरम्यान तणाव निर्माण झाला होता. ही कारवाई या पार्श्वभूमीवर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. लष्कराने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर देशात एका वर्षासाठी आणीबाणी जाहीर केल्यामुळे सत्तेची सुत्रे लष्कराचे कमांडर इन चीफ मिन आंग ह्लाईंग यांच्या हाती आली आहेत.

एनएलडीचे प्रवक्ते म्हणाले, आज सकाळी आंग सान सू की, राष्ट्राध्यक्ष आणि इतर नेत्यांना कुठेतरी नेण्यात आले. आपल्या लोकांना मी सांगू इच्छितो की, या वेळीही कायद्याचे पालन करा. मला स्वतःला अटक होण्याची शक्यता वाटते. म्यानमारच्या लष्कराने अटक सत्रावर अद्याप काहीही म्हटलेले नाही. देशात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत एनएलडीने मोठा विजय मिळवला होता.

लष्करी सैनिकांना रंगून शहरतात सीटी हॉलच्या बाहेर तैनात करण्यात आले आहे. फेसबुकवरुन सरकारी एमआरटीव्हीने सांगितले की, तांत्रिक कारणांमुळे ते थेट प्रसारण करु शकत नाहीत. तर एनएलडीच्या एका नेत्याने सांगितले की, पक्षाची केंद्रीय कार्यकारिणी समितीच्या एका सदस्यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे.

२०१५ मध्ये राष्ट्रीय निवडणुकांमध्ये मोठा विजय मिळवत म्यानमारच्या राजकारणातील महत्वाच्या नेत्या असलेल्या आंग सान सू की या ७५ वर्षीय महिला नेत्या सत्तेत आल्या होत्या. त्यांना तत्पूर्वी मोठ्या कालावधीसाठी राहत्या घऱी नजरकैदेत ठेवण्यात आल्यामुळे त्या आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रकाशझोतात आल्या होत्या. मात्र, म्यानमारमधील रोहिंग्यांच्या मुद्द्यावरुन त्यांच्या प्रतिमेला तडा गेला होता.