कोरोनामुळे यंदा अर्थसंकल्प सादर करण्याची पारंपरिक पद्धत निघणार मोडीत


नवी दिल्ली – देशाचा यावर्षाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार असून निर्मला सीतारमन कोरोनामुळे फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी कोणत्या घोषणा करणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. केंद्रातील मोदी सरकारसमोर कोरोना संकटातून सावरताना विकासाचे ध्येय गाठण्याचे आव्हान आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात आरोग्य, पायाभूत सुविधा आणि शेजारी देशांमुळे निर्माण झालेल्या सीमासंघर्षांच्या पार्श्वभूमीवर संरक्षणासाठी भरीव तरतूदही केली असावी, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. असे असतानाच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सकाळी अर्थ मंत्रालयामधून संसदेसाठी निघाण्याआधी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक बदल करण्यात आल्याची माहिती पत्रकारांना दिली. अर्थमंत्र्याच्या घोषणेमुळे कोरोनामुळे यंदा अर्थसंकल्प सादर करण्याची पारंपरिक पद्धत मोडीत निघणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अर्थमंत्री सीतारामन आज सकाळी पावणे नऊच्या सुमारस अर्थ मंत्रालयात पोहचल्या, तेव्हा त्यांनी यंदाचा अर्थसंकल्प हा पूर्णपणे पेपरलेस असेल अशी माहिती दिली. नेहमीप्रमाणे बही खाता म्हणजेच कागदपत्रे असणारी बॅग आणण्याऐवजी यावेळी सीतारामन यांच्याकडे लॅपटॉप असल्याचे पहायला मिळाले. लाल रंगाचं कव्हर असणाऱ्या या लॅपटॉपवर राजमुद्रेचे चिन्ह होते.

अर्थ मंत्रालयामधून संसदेत जाण्यासाठी सीतारामन आणि अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर हे निघाले तेव्हा त्यांनी कोरोनामुळे यंदाचा अर्थसंकल्प हा पेपरलेस असल्याची माहिती दिली. या अर्थसंकल्पाची डिजीटल कॉपी ऑनलाइन उपलब्ध असेल, असेही सांगण्यात आले आहे. निर्मला सीतारामन सकाळी पावणे नऊच्या सुमारास अर्थमंत्रालयामध्ये पोहचल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत अनुराग ठाकूर आणि इतर अधिकारीही होते.

सोमवारी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचाही हा तिसरा अर्थसंकल्प आहे. आरोग्यक्षेत्रातील पायाभूत सेवा-सुविधांसाठी तरतूद, बँकिंग क्षेत्रात सुधारणा आणि मागणीला चालना देण्यासाठी उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे. आर्थिक दृढीकरण आणि १५व्या वित्त आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यावरही भर असेल.