मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर शिक्कामोर्तब


मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार आहे. राज ठाकरे १ मार्च ते ९ मार्चच्या दरम्यान एखाद्या दिवशी अयोध्या दौरा करणार असून ते रामलल्लांचे दर्शन घेणार आहेत. मुंबईमध्ये आज झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याची माहिती पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. राज ठाकरे ९ मार्चनंतर राज्यभरामध्ये दौरा करणार असल्याचे समजते.

राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेच्या हिंदुत्ववादी भूमिकेबद्दल प्रमुखविरोधी पक्ष असणाऱ्या भाजपने अनेकदा प्रश्न उपस्थित केल्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झालेली ही हिंदुत्ववादी पक्षाची जागा भरुन काढण्याच्या दृष्टीकोनातून मनसेने आपला पुढचा राजकीय प्रवास सुरु केल्याचे चित्र मागील काही महिन्यांपासून दिसत असल्याचे अनेक राजकीय जाणाकार सांगतात.

मागील एका वर्षामध्ये भाजपने अनेकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करुन सत्तेत आलेली शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मवाळ झाल्याची टीका केली आहे. त्यातच आता राम मंदिराच्या बांधकामासाठी निधी संकलन सुरु झाल्याने अयोध्या राम मंदिराचा मुद्दाही चर्चेत आहे. दुसरीकडे मनसे आणि भाजप एकत्र येण्यासंदर्भातील बातम्या अनेकदा चर्चेत असतात. याच सर्व पार्श्वभूमीवर मनसेचे हिंदुत्ववादी मतदारांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे समजते.

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मागच्या वर्षी सात मार्चला अयोध्येला गेले होते. शिवसेनेने अयोध्येमध्ये महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन केले होते. शिवसेनेने लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान अनेकदा भाजपची कोंडी करण्यासाठी अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा लावून धरला होता.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर राम मंदिराचा प्रश्न सुटला. पण हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेची कोंडी होतानाचे चित्र वारंवार पहायला मिळाले. निवडणुका झाल्यानंतर अयोध्येला जाणार असल्याचे ठाकरे यांनी जाहीर केले होते. सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेने हिंदूत्वाची भूमिका मवाळ केल्याची चर्चा सुरू झाली होती. याच सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी अयोध्या दौरा केला होता.