लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोला मिळाले मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे २,५०० कोटींचे कंत्राट


नवी दिल्ली – लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोला मुंबई-अहमदाबादला जोडणाऱ्या देशातील पहिल्या हाय स्पीड रेल कॉरिडोर प्रकल्पातंर्गत २५०० कोटी रुपयांचे मोठे कंत्राट मिळाले आहे. पायाभूत सुविधा उभारणी क्षेत्रातील लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो मोठी कंपनी आहे. ही माहिती कंपनीने शुक्रवारी दिली. मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प होणार आहे.

हाय स्पीड रेल कॉरिडोर प्रकल्पाची अंमलबजावणी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) करणार आहे. जपानी इ ५ शिंकानसेन टेक्नोलॉजीवर आधारीत हाय स्पीड रेल कॉरिडोर प्रकल्प आहे. मोदी सरकारचा बुलेट ट्रेन हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. ते जपानच्या सहकाऱ्याने हा प्रकल्प तडीस नेण्याचा प्रयत्न करत आहेत.

सप्टेंबर २०१७ मध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पायाभरणीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे तत्कालिन पंतप्रधान शिंझो अबे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला होता. हा ५०८ किलोमीटरचा मार्ग असून या प्रकल्पाचे बांधकाम सुरु झाल्यानंतर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मिळून ९० हजारापेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होऊ शकतात. प्रतितास ३०० किमी पेक्षा जास्त वेग गाठवण्याचा या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा उद्देश आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रन व्यतिरिक्त दिल्ली-अहमदाबाद, दिल्ली-अमृतसर, वाराणसी-हावडा, दिल्ली-वाराणासी, मुंबई-हैदराबाद, मुंबई-नागपूर, चेन्नई-मैसोर दरम्यान हायस्पीड रेल कॉरिडोरची व्यवहार्यता तपासण्याला मंजुरी देण्यात आली आहे.