आता अण्णा हजारे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी करणार उपोषण


राळेगणसिद्धी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे देशभरातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत. या उपोषणाला येत्या ३० जानेवारी रोजी महात्मा गांधींच्या पुण्यतिथीपासून राळेगणसिद्धी येथून सुरुवात होणार आहे. पाठिंबा देणाऱ्यांनी आपापल्या ठिकाणांहून यात सहभाग व्हावे, असे आवाहनही हजारे यांनी केले आहे.

अण्णा हजारे म्हणाले, आम्ही केंद्र सरकारकडे वारंवार आमच्या मागण्या मांडल्या आहेत. पंतप्रधान आणि कृषी मंत्र्यांना मी गेल्या तीन महिन्यांत पाच वेळा पत्र लिहिले. सरकारचे प्रतिनिधी येथे येऊन चर्चा करत आहेत. पण, या मागण्यांवर अद्याप कोणताही योग्य तोडगा निघू न शकल्यामुळे आता ३० जानेवारी २०२१ रोजी मी महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी दिनी राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात उपोषणाला बसणार आहे. माझी सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की केवळ मी राळेगणसिद्धी येथून उपोषण करेन, तर जे मला समर्थन देऊ इच्छितात त्यांनी आपल्या गावातून, जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततेत आंदोलन करावे. अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नसल्यामुळे राळेगणसिद्धी येथे गर्दी करणे योग्य ठरणार नाही.

जे शेतकरी आंदोलन दिल्लीत सुरु आहे, यामध्ये २६ जानेवारी रोजी जी घटना घडली, त्यामुळे आम्ही सर्वजण दुःखी आहोत. कायमच अहिंसात्मक आंदोलन मी करु इच्छितो. मी गेल्या ४० वर्षांत अनेकदा आंदोलने केली. २०११ मध्ये दिल्लीत लोकपालसाठी जे आंदोलन झाले, त्यामध्ये लाखोंच्या संख्येने जनतेने सहभाग नोंदवला. पण, एकानेही एक दगडही उचलला नाही. आंदोलनाची शांतता ही शक्ती आहे, आम्हाला गांधीजींनी हे शिकवले आहे. कोणत्याही प्रकारे आंदोलनात हिंसा होता कामा नये, अशी विनंतीही अण्णा हजारे यांनी कार्यकर्त्यांना केली.