डीजीसीएने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरील स्थिगिती वाढवली


नवी दिल्ली – पुन्हा एकदा भारतातून परदेशात जाणाऱ्या विमान उड्डाणांवरील स्थगिती वाढवण्यात आली असून याची घोषणा डीजीसीएने केली आहे. ही उड्डाणे २८ फेब्रुवारीपर्यंत बंद असतील, असे डीजीसीएने आपल्या निर्णयात म्हटले आहे.

याबाबत माहिती देताना डीजीसीएने म्हटले की, विशेष कारणासाठी काही निवडक मार्गांवरच आंतरराष्ट्रीय उड्डाणांना सक्षम प्राधिकाऱ्यांच्यामार्फत परवानगी दिली जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय विमान वाहतुक आणि त्यांच्यासाठी मंजूर उड्डाणांवर ताज्या निर्णायाचा कोणताही परिणाम होणार नाही. २८ फेब्रुवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर स्थिगिती देण्यात आली आहे.

कोरोना महामारीमुळे भारतात प्रस्तावित आंतरराष्ट्रीय उड्डाणे २३ मार्चपासून बंद आहेत. पण, मे महिन्यांत विशेष विमान उड्डाणांना ‘वंदे भारत’ मोहिमेंतर्गत परवानगी देण्यात आली होती. याशिवाय जुलैपासून काही निवडक देशांसोबत एअर बबल करारानुसार उड्डाण केली जात आहेत. भारताने सुमारे २४ देशांसोबत ‘एअर बबल’ करार केला आहे. या देशांमध्ये अमेरिका, ब्रिटन, संयुक्त अरब अमिराती, केनिया, भूतान, फ्रान्स यांसारख्या देशांचा समावेश आहे. एअर बबल करारानुसार भारताने प्रवाशी उड्डाणांसाठी खास करार केला आहे. याला एअर बबल नाव देण्यात आलं आहे. याद्वारे संबंधित देशांमध्ये त्यांच्या राष्ट्रीय एअरलाईन्स उड्डाणांचे संचलन करु शकतात.