दिल्ली पोलिसांकडून शेतकरी नेत्यांना लुकआऊट नोटीस


नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांनी प्रजासत्ताकदिनी झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी नेत्यांवर गुन्हे दाखल केले असून लुक आउट नोटीसही या सर्व नेत्यांना पाठवण्यात आली आहे. देशाबाहेर त्यांनी जाऊ नये यासाठी त्यांचे पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे. हिंसाचाराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबत पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, शेतकरी नेत्यांना त्यांचे पासपोर्ट जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एफआयआरमध्ये राकेश टिकैत, दर्शन पाल, राजिंदर सिंह, बलबिरसिंह राजेवाल, बुटासिंग बुर्जगिल, योगेंद्र यादव, मेधा पाटकर आणि जिगिंदर सिंह उग्रहा यांच्यासह ३७ शेतकरी नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांची नावांचा समावेश आहे. दिल्ली पोलीस आणि शेतकरी नेत्यांमध्ये प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर परेड काढण्यासंदर्भात झालेल्या कराराच्या नियमाचा भंग झाल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी रात्री उशीरा दिल्लीतील हिंसाचारप्रकरणी आढावा बैठक घेतली. तसेच गुरुवारी सकाळी देखील त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच याबाबत अधिकारी वर्गही लक्ष ठेऊन आहे, अशी माहिती पीटीआयने दिली आहे. काल पत्रकार परिषेदत दिल्ली पोलिसांनी सांगितले की, नियमांचे शेतकरी संघटनांनी पालन केले नाही. दुपारी १२ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५,००० ट्रॅक्टर्स रस्त्यावर आणण्याची परवानगी देण्यात आली होती. पण, याचे उल्लंघन करण्यात आले.