राज कपूर यांच्या वडिलोपार्जित हवेलीच्या विक्रीला मालकाने दिला नकार


पाकिस्तानामधील बॉलिवूडचे दिवंगत अभिनेता राज कपूर यांच्या वडिलोपार्जित हवेली विकण्यास हवेली मालकाने नकार दिला आहे. ही हवेली सरकारकडून ठरवून दिलेल्या किंमतीत विकता येणार नसल्याचे हवेली मालकाने सांगितले आहे. पाकिस्तानतील पेशावर शहराच्या मध्यवर्ती भागात राज कपूर यांची वडिलोपार्जित हवेली आहे. पाकिस्तानच्या पख्तुनख्वा सरकारचा ही हवेली खरेदी करुन त्याचे संग्रहालयात रुपांतर करण्याचा मानस आहे. त्यांनी यासाठी २.३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. पण, आता ही हवेली विकण्यास हवेली मालकाने नकार दिला आहे.

सध्या हाजी अली साबिर हे राज कपूर यांच्या हवेलीचे मालक असून त्यांनी ही हवेली कमी किंमतीत विकण्यास नकार दिला आहे. मोक्याच्या ठिकाणी राज कपूर यांची ही हवेली असल्यामुळे सरकारने ही हवेली खरेदी करण्यासाठी जी रक्कम ठरवून दिली आहे. ती अत्यंत कमी असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. ५१.७५ चौरस मीटर ही हवेली आहे. सरकारने या हवेलीची किंमत १.५० कोटी रुपये ठरवली आहे. सध्याच्या घडीला ही किंमत अत्यंत कमी असल्यामुळे ही हवेली विकणे शक्य नसल्याचे हाजी अली साबिर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, किस्सा ख्वानी बाजार भागात ‘कपूर हवेली’ नावाने ओळखली जाणारी राज कपूर यांची वडिलोपार्जित हवेली आहे. १९१८ ते १९२२ दरम्यान त्यांचे आजोबा दिवाण बसेश्वरनाथ कपूर यांनी ती बांधली होती. या इमारतीत राज कपूर व त्यांचे काका त्रिलोक कपूर यांचा जन्म झाला. हे घर राष्ट्रीय वारसा स्थळ प्रांतिक सरकारने जाहीर केले आहे.