वाशी न्यायालयाचे राज ठाकरे यांना 6 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश


मुंबई : वाशी न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राज ठाकरे यांनी जामीन घेतला नसल्यामुळे 6 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा आदेश नायाधीश बडे यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान देण्यात आला आहे. 2014 मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी वाशी टोलनाफा फोडला होता. त्या प्रकरणात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

राज ठाकरे यांनी 26 जानेवारी 2014 रोजी वाशी येथील मेळाव्यात टोल नाका बंद करण्याबाबत प्रक्षोभक भाषण केले होते. गजाजन काळे यांनी काही कर्यकर्त्यांसह त्यानंतर लगेच वाशी टोल नाका फोडला होता. त्याबाबत वाशी पोलीस ठाण्यात 30 जानेवारी 2014 रोजी गुन्हा दाखल झाला होता. 2018, 2020 मध्येही या प्रकरणात राज ठाकरे यांच्याविरोधात समन्स आणि वॉरंट काढण्यात आले होते. ते वॉरंट आज रद्द झाले आहे. पण राज ठाकरे यांनी 6 फेब्रुवारीला न्यायालयात उपस्थित राहणे गरजेचे असल्यामुळे राज ठाकरे आता वाशी न्यायालयात हजर राहतात की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राज्य सरकारकडून नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. राज ठाकरे यांची Z दर्जाची सुरक्षा काढून त्यांना Y+ सुरक्षाव्यवस्था देण्यात आली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी त्यावरुन नाराजी व्यक्त केली होती. तसेच राज ठाकरे यांना सुरक्षा पुरवण्यासाठी पोलिसांची गरज नाही, तमाम मनसे कार्यकर्तेच राज ठाकरे यांना सुरक्षा देतील, अशी संतापजनक प्रतिक्रिया मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यावेळी दिली होती.