देवेंद्रजी तुम्हाला लवकरच मिळेल मुंबई मेट्रो -३ मध्ये फोटो काढून ट्विट करण्याची संधी


मुंबई – दिल्ली मेट्रोतील फोटो बुधवारी माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले होते. मेट्रो-३ या मार्गाने मी विमातळापर्यंत असा प्रवास कधी करू शकेन, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारला चिमटा काढला होता. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने यावरून त्यांना टोला लगावला आहे.


महाविकास आघाडी सरकार मुंबई मेट्रो – ३ हा प्रकल्प पूर्ण करेल यात शंका नाही, पण वारंवार केंद्राकडून अडथळा निर्माण केला जात असल्याची मुंबईकरांची भावना असल्यामुळे फोटो काढून ट्विट करण्याची व फिरण्याची संधी देवेंद्र फडणवीस यांना मिळावी ही मुंबईकरांची अपेक्षा असल्याचा टोला राष्ट्रवादीचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.


मुंबई मेट्रो – ३ लवकरच महाविकास आघाडी सरकार सुरू करेल आणि ती पूर्ण करण्यासाठी कटिबद्धही आहे. पण केंद्राकडून वारंवार मदतीऐवजी आडकाठी होत असल्यामुळे केंद्रासोबत आपण समन्वय केला तर प्रकल्प लवकर पूर्ण होऊ शकेल आणि मुंबईकरांना दिलासा मिळू शकेल, असेही तपासे म्हणाले.