‘टीम इंडिया’चा आणखी एक स्टार खेळाडू अडकला विवाहबंधनात


भारताला २०१९च्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत स्पर्धेबाहेर व्हावे लागले. पण भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धूळ चारली. त्यावेळी भारतीय संघात आपला विश्वचषकातील पदार्पणाचा सामना खेळणारा एक खेळाडू होता. आपल्या पहिल्याच चेंडूवर त्याने पाकिस्तानी सलामीवीराला माघारी धाडले. विश्वचषकसारख्या मोठ्या स्पर्धेत धमाकेदार सुरूवात करणारा टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू म्हणजे विजय शंकर हा प्रेमाच्या पिचवर मात्र ‘क्लीन बोल्ड’ झाला.

काही खेळाडूंनी कोरोनाकाळात साखरपुडा उरकुन घेतला. त्यात विजय शंकरचा देखील समावेश होता. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याने ही माहिती दिली होती. वैशाली विश्वेवरन हिच्यासोबत विजय शंकर याने साखरपुडा केल्याची घोषणा आपल्या इन्स्टाग्रामवरून केली होती. त्याने इन्स्टाग्रामवर आपल्या साखरपुडा सोहळ्यातील काही क्षणचित्रे पोस्ट केली होती. तर काही फोटो त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरही पोस्ट केलेली दिसले.

साखरपुड्याच्या पाच महिन्यांनंतर तो आज विवाहबंधनात अडकला. सध्या टीम इंडिया आणि तामिळनाडू असे दोन्ही संघ क्रिकेट स्पर्धांच्यानिमित्त बायो-बबलमध्ये असल्यामुळे कोणीही क्रिकेटपटू त्याच्या लग्नाला उपस्थित राहू शकले नाहीत. पण सनरायझर्स हैदराबादने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करून त्याला शुभेच्छा दिल्या. विजय शंकर वैशालीशी लग्न झाल्यानंतर काही महिन्यांतच पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. हैदराबादकडून तो IPL खेळताना दिसणार आहे. त्याला हैदराबादने संघात कायम राखले आहे.