गृहमंत्र्यांनी केलेल्या ट्विटवर आक्षेप नोंदवत चंद्रकांत पाटील यांनी केली टीका


मुंबई – भाजपच्या संकेतस्थळावर (वेबसाईट) खासदार रक्षा खडसे यांच्याविषयी आक्षेपार्ह उल्लेख झाल्याने सगळीकडे चर्चा सुरू आहे. सोशल मीडियात चुकीचा शब्द वापरला गेल्याचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही याप्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईचा इशारा दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देशमुख यांनी केलेल्या ट्विटवरून टीका केली आहे.

खासदार रक्षा खडसे यांच्या मतदारसंघाऐवजी चुकीचा शब्द भाजपच्या वेबसाईटवर वापरण्यात आल्याचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला. त्यावरून बरीच चर्चाही सुरू आहे. याची दखल घेत कारवाईचा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही दिला. पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्र्यांनी केलेल्या ट्विटवर आक्षेप नोंदवत टीका केली आहे.

याच्यामागे कोण आहे, हे भाजप नक्कीच शोधून काढेल व कारवाई करेल. पण गृहमंत्रीजी, तुम्हाला खरच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता, तर असा बदनामीकारक मजकूर आपण कधीच ट्विटमध्ये वापरला नसता, असे सांगत निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रातील भाजप खासदार रक्षा खडसे यांच्याबद्दल भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर असा अपमानास्पद उल्लेख पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजप आपण दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल, असे देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.