‘लगेज’ कमी करण्यासाठी एअरपोर्टवर चार मित्रांनी अर्ध्यातासात फस्त केले 30 किलो संत्रे


नवी दिल्ली – आपण जर विमानाने प्रवास करणार असाल आणि त्यातच तुम्ही तयारीनिशी विमानतळावर पोहोचल्यानंतर तुमच्याकडे असलेले सामान ठरवलेले प्रमाणापेक्षा जास्त असल्याचे सांगितल्यावर तुमचा चेहरा काय होतो हे काही वेगळे सांगायला नको. पण अशावेळेस आपल्यापैकी अनेक फुंगसुक वांगडु काहीतरी जुगाड शोधत असतात.

काही महिन्यांपूर्वी आम्हीच तुम्हाला सामानाचे वजन कमी करण्यासाठी एकदा एक व्यक्ती तर एकावर एक अनेक टी-शर्ट घालून विमानात चढल्याची माहिती दिली होती. आता एक असाच अनोखा प्रकार चीनमधून समोर आला आहे. सामान जास्त झाले म्हणून अतिरिक्त शुल्क द्यावे लागू नये म्हणून या चार व्यक्तींनी असे काही केले की त्यावर विश्वास ठेवणे कठीण होईल.

३० किलो संत्रे चौघांकडे असल्यामुळे सामानाचे वजन जास्त झाले होते. आता त्या सामानाचे अतिरिक्त पैसे भरावे लागू नये यासाठी त्या चौघांनी तब्बल ३० किलो संत्रे अवघ्या अर्ध्यातासातच फस्त केले. पण त्यानंतर एक वेगळाच त्रास त्यांना झाला. ही घटना चीनच्या युनान प्रांतात घडली.

आपल्या मित्रांसाठी ३० किलो संत्रे वांग नावाच्या एका व्यक्तीने एका बॉक्समध्ये आणले होते. ते मित्रांसोबत बिजनेस ट्रिपला निघाले होते. त्यांनी ५० युआन ( जवळपास ५६४ रुपये) देऊन संत्र्याचा बॉक्स खरेदी केला होता. पण विमानतळावर पोहोचल्यावर सामान जास्त असल्याचे त्यांना सांगण्यात आले. जादा सामानासाठी त्यांना ३०० युआन ( जवळपास३,३८४ रुपये) द्यावे लागले असते. पण त्यांनी यावर जुगाड शोधला.

अतिरिक्त शुल्क खूप जास्त असल्यामुळे वांग आणि त्याच्या मित्रांनी सर्व संत्रे तिथेच खाण्याचे ठरवले. ग्लोबल टाइम्सला वांगने सांगितले की, विमानतळावरच उभे राहून त्याच्या मित्रांनी आणि त्याने संत्रे खाण्यास सुरूवात केली आणि २० ते ३० मिनिटांमध्ये सर्व संत्रे संपवलेही. पण, एवढी संत्री खाल्ल्यामुळे असामान्य आहाराचा परिणाम त्यांना सहन करावा लागला आणि त्यांच्या तोंडात अल्सरचा त्रास होऊ लागला. त्यांना आता यापुढे आयुष्यात पुन्हा कधीही संत्रे खाण्याची इच्छा होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. विमानतळावर येणारे-जाणारे अन्य प्रवासीही त्यांना उभे राहून एवढी संत्री खाताना बघून हैराण झाले होते.