वडीलांच्या सुटकेसाठी तेजप्रताप यांचे ‘आझादी पत्र’ अभियान


पाटना – बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याचे समोर येत असून दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांच्या सुटकेची मागणी आता सुरू झाली आहे. तेजप्रताप यादव यांनी या पार्श्वभूमीवर आपल्या वडिलांच्या सुटकेसाठी ‘आझादी पत्र’ अभियान सुरू केले आहे. राष्ट्रपतींकडे लालू प्रसाद यादव यांच्या सुटकेची त्यांनी मागणी केली आहे. याशिवाय, या अभियानात बिहारमधील जनतेने देखील सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

ट्विटद्वारे या संदर्भात तेजप्रताप यादव यांनी म्हटले आहे की, आपल्याला ज्यांनी बळ दिले, त्यांच्यासाठी ताकद निर्माण करण्याची आज वेळ आली आहे. एका अभियानाशी जोडले जा आणि आपल्या नेत्याच्या सुटकेसाठी मागणी करा. गरिबांचे कैवारी आदरणीय लालू प्रसाद यादव यांच्यासाठी एक ‘आझादी पत्र’ राष्ट्रपती पर्यंत पोहचवा.


तेजप्रताप यांनी हे देखील म्हटले आहे की, खोट्या खटल्यामध्ये माझ्या वडिलांना अडकवले गेले आहे आणि त्यांना आजवर बंदी बनवून ठेवले आहे. मागील अनेक महिन्यांपासून माझे वडिल आजारी आहेत. तरी देखील त्यांना तुरुंगात ठेवले गेले. केंद्राकडून हा राजकीय छळ आहे. एक मुलगा या नात्याने मी संकल्प केला आहे की, त्यांचा आवाज जनमानसांपर्यंत पोहचवायचा आहे. मग माझा जीव गेला तरी हरकत नाही. आपल्याला जोपर्यंत यश मिळत नाही, तोपर्यंत हे अभियान सुरूच राहील.

दिल्लीतील एम्स रूग्णालयात पुढील उपचारासाठी रांचीतील ‘रिम्स’मध्ये उपचार घेत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांना दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती ढासळत चालल्याने अधिक चांगले उपचार मिळावेत या दृष्टीने रिम्समधील डॉक्टरांनी त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला होता.


लालू यांच्या फुफ्फुसात पाणी झाले असून, चेहऱ्यावर सूज आली आहे. त्यांची एक किडनीही खराब झाली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती लालू प्रसाद यादव यांचे सुपूत्र आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी दिली होती. त्यानंतर त्यांना तातडीने शनिवारी संध्याकाळी दिल्लीच्या एम्स रूग्णालयात हलवण्यात आले.