Apple च्या ‘मॅकबूक प्रो’ची Microsoft ने उडवली खिल्ली


नवी दिल्ली – आपल्या ‘सरफेस रेंज’ प्रोडक्ट्सची टेक कंपनी मायक्रोसॉफ्ट जोरदार मार्केटिंग करत असते. कंपनी नेहमीच डिझाइनपासून किंमतीपर्यंतचा विचार केल्यास ‘सरफेस प्रोडक्ट्स’ बेस्ट असल्याचा दावा करते. ‘सरफेस प्रो 7’ सर्वोत्तम आहे हे सांगण्यासाठी यावेळी याची तुलना मायक्रोसॉफ्टने अ‍ॅपलच्या मॅकबूक प्रोसोबत केली आहे. मायक्रोसॉफ्टने नवीन सरफेस प्रो 7 च्या जाहिरातीत अ‍ॅपल मॅकबूक प्रोच्या डिझाइनमधील उणीवा सांगून खिल्ली उडवली आहे. अशाप्रकारची मार्केटिंग यापूर्वीही अनेकदा बघायला मिळाली आहे.

मायक्रोसॉफ्टने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आपल्या सरफेस प्रो 7 ची अ‍ॅपल मॅकबूक प्रोसोबत थेट तुलना केली असून सरफेस प्रोमध्ये फुल टचस्क्रीन दिल्याचे म्हणत मॅकबूक प्रोची खिल्ली उडवली आहे. अ‍ॅपल मॅकबूक प्रोमध्ये टचस्क्रीनऐवजी की-बोर्डच्या वरती टच बार दिला आहे. सरफेस प्रोप्रमाणे अ‍ॅपल टचस्क्रीन का देऊ शकत नाही, असा सवालही मायक्रोसॉफ्टने व्हिडिओमधून विचारला आहे.

डिटॅचेबल की-बोर्डही व्हिडिओमध्ये दाखवण्यात आला आहे. गरज नसताना सरफेस प्रो 7 चा की-बोर्ड वेगळा काढता येतो, तर मॅकबूक युजर्सना हा पर्याय मिळत नाही. सरफेस प्रो 7 ला युजर्स आवश्यकतेनुसार टॅबलेटप्रमाणेही वापरु शकतात. तर, अ‍ॅपल आपल्या आयपॅड प्रोसोबत डिटॅचेबल की-बोर्ड सिस्टिम देत आहे, तर मॅकबुक प्रो स्टँडर्ड लॅपटॉप डिझाइनसह बाजारात उपलब्ध आहेत.

मायक्रोसॉफ्टने केवळ 30 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये गेमिंग डिव्हाइस नसल्याबद्दलही मॅकबूकची खिल्ली उडवली आहे. मायक्रोसॉफ्टकडून यापूर्वीही अनेकदा आपल्या प्रोडक्ट्सच्या मार्केटिंगसाठी अ‍ॅपलला ट्रोल केलं आहे. व्हिडिओमध्ये अ‍ॅपल मॅकबूक प्रो आणि सरफेस प्रो 7 दोन्ही प्रोडक्ट्सच्या किंमतीचीही तुलना करण्यात आली आहे. अ‍ॅपल मॅकबुक प्रोची बेसिक किंमत 1,299 डॉलर ( जवळपास 94,826 रुपये) आहे, तर सरफेस प्रो 7 ची बेसिक किंमत 890 डॉलर ( जवळपास 64,969 रुपये) आहे. महागड्या प्रोडक्ट्सवरुन जवळपास सर्वच कंपन्या अ‍ॅपलवर निशाणा साधत असतात. दरम्यान, मॅकबूक प्रो आणि सरफेस प्रो 7 दोघांच्या बेसिक व्हेरिअंटच्या किंमतीत फरक असला तरी टॉप व्हेरिअंटच्या किंमतीत मात्र जास्त फरक नाही आहे.